नसरापूर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रवासाला गती मिळावी आणि गरजू मुला-मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी मदतीचा हात मिळावा, या उद्देशाने नसरापूर येथे मोफत सायकल वाटप समारंभ उत्साहात पार पडला. विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. शिवसेना भोर, राजगड, मुळशी तालुका, भोर-राजगड शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा प्रतिष्ठान, कुलदीप तात्या कोंडे युवा मंच तसेच सिंहगड प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी तब्बल 500 विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. जिल्हाप्रमुख रमेशबापू कोंडे म्हणाले की, “या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत नवी आशा निर्माण झाली आहे. शिक्षणासाठी झगडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान म्हणजेच या कार्याचे खरे यश आहे.” तर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक कुलदीप तात्या कोंडे म्हणाले की, “ग्रामीण भागातील विद्यार्थी हेच आपल्या देशाचे भविष्य आहेत. त्यांच्या शिक्षणात अडथळे येऊ नयेत, त्यांचा प्रवास थांबू नये, म्हणूनच हा उपक्रम राबविण्यात आला. आज विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आमच्यासाठी सर्वात मोठे समाधान आहे. यापुढेही शिक्षणासाठी असे उपक्रम राबवण्याचा आमचा संकल्प आहे.” या समारंभाला माजी उपसभापती अमोल पांगारे, निलेश घारे, युवा नेते सचिन आण्णा बांदल, दीपक करंजावणे, भोर तालुका युवा सेनेचे अध्यक्ष स्वप्निल गाडे, प्रमोद शिळीमकर, योगेश मांगले, सूरज जगताप, विशाल खुटवड, गणेश धुमाळ, संतोष इंगुळकर, दत्तात्रय खुटवड यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, भोर-राजगड प्रतिष्ठानचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला नवी दिशा मिळून त्यांच्या स्वप्नांना पंख मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.