Nasrapur : नसरापूर-राजगड महामार्गाची दुरवस्था: प्रशासनाकडून मात्र दुर्लक्ष

नसरापूर (ता. भोर): सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अखत्यारीतील नसरापूर-राजगड महामार्गावरील अनेक जुनी झाडे धोकादायक बनली आहेत. पावसाळ्यात वाऱ्यामुळे झाडे किंवा त्यांच्या फांद्या रस्त्यावर पडत असून, नागरिक आणि पर्यटकांचा जीव धोक्यात येत आहे.
महावितरणच्या विद्युत वाहिन्यांमध्ये झाडांच्या फांद्या अडकल्याने विद्युत अपघाताचा धोका वाढला आहे. मात्र, PWD, वनविभाग आणि महावितरण यापैकी कोणीही कारवाई करत नसल्याने नागरिक संतप्त आहेत. रस्त्यांवर खड्डे, साचलेले पाणी आणि पडलेली झाडे यामुळे वाहनचालकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. राजगड, तोरणा आणि बनेश्वरसारख्या पर्यटनस्थळांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असूनही प्रशासनाचे दुर्लक्ष कायम आहे.
नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही PWD, वनविभाग आणि महावितरण जबाबदारी झटकत आहेत. वनविभागाचे म्हणणे आहे की, “झाड तोडण्यासाठी परवानगी मागितलीच नाही,” तर महावितरणला “कॉन्ट्रॅक्टची माहिती नाही.” प्रशासनातील समन्वयाचा अभाव स्पष्ट दिसतो. स्थानिकांनी चेतावणी दिली आहे की, ही परिस्थिती सुधारली नाही, तर आंदोलन करावे लागेल. रस्त्यांची दुरुस्ती, धोकादायक झाडांची कटाई आणि विद्युत वाहिन्यांची स्वच्छता तातडीने करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.





