Nasrapur Case Verdict: अवघ्या ५५ दिवसांत निकाल! भीमराव कांबळे दोषी, फाशी की जन्मठेप? जाणून घ्या
Nasrapur Case Verdict: साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्येप्रकरणी ६५ वर्षीय भीमराव कांबळे विशेष न्यायालयात दोषी; डीएनए अहवाल आणि वैज्ञानिक पुराव्यांमुळे गुन्हा सिद्ध.

Nasrapur Case Verdict – नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची महाराष्ट्र दिनी (दि. १ मे) निर्घृण हत्या केल्याप्रकरणी आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याला विशेष न्यायालयाने दोषी ठरविले आहे. त्याला मृत्युदंड की जन्मठेप, याबाबतचा अंतिम निर्णय २९ जूनला जाहीर होणार आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांच्या न्यायालयात या प्रकरणाची दैनंदिन सुनावणी झाली.
राज्याच्या न्यायालयीन इतिहासात अवघ्या ५५ दिवसांत अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या दुर्मिळ खटल्यांपैकी हा एक ठरला आहे. सरकार पक्षाने सादर केलेले डीएनए अहवाल, न्यायवैद्यकीय पुरावे, सीसीटीव्ही चित्रीकरण, परिस्थितीजन्य पुरावे तसेच साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे आरोपीचा गुन्हा निर्विवादपणे सिद्ध झाल्याचे न्यायालयाने मान्य केले. बचाव पक्षाने मांडलेले सर्व मुद्दे पुराव्यांपुढे निष्प्रभ ठरल्याचेही निरीक्षण नोंदविण्यात आले.
सुनावणीदरम्यान आरोपीने स्वतःचा बचाव करताना घटनेच्या दिवशी मुलीला खाऊ दिल्यानंतर गोठ्याकडे नेत असताना तिचा पाय घसरून ती पडल्याचा दावा केला होता. मात्र, वैद्यकीय पुरावे, घटनास्थळावरील परिस्थिती आणि इतर साक्षींच्या आधारे न्यायालयाने हा बचाव पूर्णपणे फेटाळून लावला. तपासादरम्यान चिमुकलीच्या शरीरावर तब्बल १८ गंभीर जखमा आढळून आल्या होत्या. ३९ मिनिटांच्या कालावधीत आरोपीने हे भीषण कृत्य केल्याचे तपासातून स्पष्ट झाले.
यापूर्वीही आरोपीवर दोन महिलांवर तसेच एका जनावरावर अत्याचार केल्याच्या घटनांची नोंद असल्याचा मुद्दाही सरकार पक्षाने शिक्षेच्या सुनावणीवेळी उपस्थित केला. पुणे ग्रामीण पोलिसांनी विशेष तपास पथकाच्या माध्यमातून अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. ५५ पेक्षा अधिक साक्षीदार, वैज्ञानिक पुरावे आणि तांत्रिक तपासाच्या आधारे खटल्याची सुनावणी जलदगतीने पूर्ण करण्यात आल्याचे पोलीस अधिक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी सांगितले.
कठोरातील कठोर शिक्षा द्या…
विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी शिक्षेबाबत युक्तिवाद करताना हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचे नमूद केले. महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे अस्तित्वात असतानाही अशा अमानुष घटना घडत असल्याने आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देणे आवश्यक असल्याचे त्यांनी न्यायालयास सांगितले. आरोपीचे कृत्य अत्यंत क्रूर, घृणास्पद आणि समाजमन हादरविणारे असल्याने त्याला फाशीची शिक्षा सुनावण्याची मागणीही सरकार पक्षाने केली.
छोट्या मुलांचा जबाब…
हे प्रकरण संवेदनशिल होते. मात्र प्रत्यक्षदशी साक्षीदार कोणी नव्हते. यामुळे परिस्थितीजन्य पुरावाच्या आधारे पोलिसांनी हे प्रकरण शिक्षेपर्यंत नेले. मुलीला घेऊन जाताना आरोपीने इतर खेळणाऱ्या मुलांवर दगडफेक केले होती. जेणेकरुन ते मागे येणार नाहीत. मात्र, यानंतरही मुले पत्र्याच्या शेडकडे आल्यावर त्याने मुलांवर वीट उगारली होती. यामुळे मुले घाबरुन पळून गेली होती. या छोट्या मुलांचा जबाबही महत्वाचा ठरला.






