फसवणूक प्रकरणात राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाला नाशिक पोलीस पाठवणार समन्स

मुंबई – नाशिक पोलिसांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे चिरंजीव वैभव गेहलोत यांना फसवणूकीच्या प्रकरणी समन्स पाठवणार आहेत. फसवणूक, विश्वासघाताचे गुन्हेगारी स्वरुपाचे प्रकरण आणि धमकावण्याचे एक प्रकरण नाशिक पोलिसांनी गेल्या आठवड्यात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी वैभव गेहलोत यांच्यासह अन्य 14 जणांना समन्स पाठवले जाईल, असे नाशिक पोलिसांनी म्हटले आहे.
नाशिक न्यायालयाच्या निर्देसानुसार हे प्रकरण दाखल करण्यातच आले होते. या प्रकरणी तक्रारदाराने दाखल केलेल्या कागदपत्रांची छाननी करण्याचे काम केले जात आहे. त्यानंतर या संदर्भातील प्रत्येकाला चौकशीसाठी समन्स पाठवले जाईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाझ शेख यांनी सांगितले.
नाशिकमधील उद्योगपती सुशील पाटील यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती. सचिन वालेरा नावाच्या एका व्यक्तीने आपल्याला गुंतवणूकीसाठी आमिष दाखवले. त्या व्यक्तीला आपण 6.80 कोटी रुपये दिले. वालेरा यांनी करोनाच्या काळात पैशाची परतफेड करणे थांबवले.
पैशाची मागणी केल्यावर वैभव गेहलोत यांनी पोन करून आपल्याला धमकावल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. वालेरा हे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि त्यांच्या चिरंजीवांच्या जवळची असल्याचे पाटील यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.





