राणेंना आता नाशिक पोलिसांची नोटीस; 2 सप्टेंबर रोजी द्यावी लागणार हजेरी

मुंबई – महाडच्या कोर्टाने काल जामीन मंजुर केल्यानंतरही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. त्यांना आता नाशिक पोलिसांनी नोटीस जारी केली असून त्यांना 2 सप्टेंबर रोजी हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात नाशिक मध्येही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने त्यांना ही नोटीस जारी करण्यात आली आहे. भारतीय दंडविधानाच्या कलम 500, 505(2), 153 (बी) (1) (सी) या कलमान्वये त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्या विरोधात जो गुन्हा नोंदवण्यात आला आहे, त्या अनुषंगाने आपली चौकशी करणे आवश्यक ठरल्याने आपण तपास अधिकाऱ्यांच्या पुढे हजर राहावे असे त्यांना बजावण्यात आलेल्या नोटीशी मध्ये म्हटले आहे.
सीआरपीसीच्या कलम 41 अंतर्गत ही नोटीस जारी करण्यात आली आहे. या प्रकरणात जेव्हा गरज असेल त्यानुसार चौकशीला हजर राहण्यासही राणे यांना सांगण्यात आले आहे. राणे हे पोलिसांना सहकार्य करीत आहेत, त्यांनी यापुढे असला प्रकार करणार नाही असे त्यांनी पोलिसांना लिहून दिले आहे, त्यामुळे त्यांना अटक करण्यात आलेली नाही.
त्यांना फक्त चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस जारी केली गेली आहे असे नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितले. पांडे यांनी काल राणेंना अटक करण्याचा आदेश काढला होता व त्यासाठी पथकेही कोकणात पाठवली होती. आपल्या या कृतीचेही पांडे यांनी आज समर्थन केले. माझ्या मते मी काढलेली ऑर्डर योग्य आहे आणि त्या बाबत मी ठाम आहे असे पोलिस आयुक्तांनी आज पत्रकारांना सांगितले. राणे यांच्या विरोधात एकूण चार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.





