Nashik News | अमेझॉनच्या नावाखाली करोडोंची फसवणूक ; इगतपुरीत सीबीआयची धडक

प्रभात वृत्तसेवा
नाशिक – केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी (रेनफॉरेस्ट रिसॉर्ट) येथील एका बेकायदेशीर कॉल सेंटरचे रॅकेट उद्ध्वस्त केले. या सायबर फसवणुकीच्या प्रकरणात सीबीआयने मुंबईचे रहिवासी असलेल्या सहा व्यक्ती तसेच इतर अज्ञात व्यक्ती आणि बँक अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पाच आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.सीबीआयने दिलेल्या प्रथम माहितीनुसार, आरोपींनी परस्परांच्या संगनमताने तसेच इतर काही अज्ञात व्यक्तींसोबत गुन्हेगारी कट रचून, बेकायदेशीर कॉल सेंटरच्या माध्यमातून स्वतःला अमेझॉन सपोर्ट सर्व्हिसेस कॉल सेंटरचे प्रतिनिधी असल्याचे भासवले आणि फसव्या कॉल्सच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केली.
या गुन्ह्यातील आरोपी अमेरिका, कॅनडा आणि इतर देशांतील नागरिकांची फसवणूक करून त्यांच्याकडून गिफ्ट कार्ड्स किंवा क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून बेकायदेशीर कमाई करत होते. हे कॉल सेंटर नाशिकमधील इगतपुरी येथून चालवले जात होते. आरोपींनी हे बेकायदेशीर कॉल सेंटर चालवण्यासाठी डायलर्स, व्हेरिफायर्स आणि क्लोजर्स अशा पदांअंतर्गत सुमारे ६० कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती.
या प्रकरणात सीबीआयने केलेल्या तपास आणि कारवाई अंतर्गत ४४ लॅपटॉप, ७१ मोबाइल फोन आणि इतर महत्त्वाच्या डिजिटल पुराव्यासंह, एक कोटी २० लाख रुपयांची बेहिशेबी रक्कम, ५०० ग्रॅम सोने आणि एक कोटी रुपये किमतीच्या सात आलिशान वाहने जप्त करण्यात आली आहेत. यासोबतच संबंधित कॉलसेंटरच्या ठिकाणी सीबीआयने छापा मारल्यानंतर कॉल सेंटरमध्ये कार्यरत असलेले ६२ कर्मचारी परदेशी नागरिकांना फसवण्याचे काम करत असल्याचे आढळून आले.





