नाशिक – निफाड तालुक्यातील धानोरे येथील रहिवासी भारतीय सैन्य दलातील जवान श्रीराम राजेंद्र गुजर (वय 24) यांचे दुचाकी अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. श्रीराम हे आसाम (गुवाहाटी) येथे भारतीय सैन्य दलात काॅन्स्टेबल पदावर कर्तव्यावर होते. अपघाताची घटना रविवारी (16 जुलै) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास सिन्नर-शिर्डी महामार्गावर सिन्नरजवळ पाथरेगावाजवळ घडली. आज मंगळवारी त्यांच्यावर धानोरे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीराम हे पंचवीस दिवसांपूर्वी सुट्टीवर आले होते. रविवारी ते शिर्डी येथून देवदर्शन करुन नातेवाईकांकडे गेले. तेथून घरी जाण्यासाठी निघाले असता त्यांच्या पल्सर दुचाकीला समोरुन येणाऱ्या प्लॅटिना दुचाकीने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात प्लॅटिनावरील दुचाकीस्वार आणि श्रीराम गंभीर जखमी झाले. श्रीराम यांच्यासोबत असलेला मावसभाऊ अक्षय उर्फ बबलू पांडुरंग जावळे यालाही जबर मार लागल्याने त्यांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर श्रीराम तसंच अपघातग्रस्तांना शिर्डी येथे साई संस्थान सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचारादम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. श्रीराम हे भारतीय सैन्य दलात बॉम्बे इंजिनिअर कोर 236 IWT युनिट मध्ये गेल्या सात वर्षांपासून कार्यरत होते. दरम्यान एक महिन्याच्या सुट्टीवर ते गावी आले होते. मंगळवारी 18 जुलै रोजी ते आपल्या कर्तव्यावर हजर होण्यासाठी जाणार होते, परंतु दुर्दैवाने तत्पूर्वीच काळाने घाला घातला. त्यांच्या पश्चात आजोबा, आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.