Nashik Accident : नाशिक-चांदवड महामार्गावरील भीषण अपघातात भाजपच्या नगरसेवकासह 4 जणांचा जागीच मृत्यू

नाशिक : नाशिक जिल्ह्यात चांदवड महामार्गावर भीषण अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या अपघातात धुळ्यातील भाजपच्या नगरसेवकासह 4 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
चांदवड तालुक्यातील नमोकार तीर्थक्षेत्रा समोरील मुंबई आग्रा महामार्गावर कार आणि कंटेनरमध्ये हा भीषण अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात कारमध्ये असणारेच जण जागीच ठार झाले असून आज सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास अपघात झाला आहे.
दरम्यान, अपघातग्रस्तांची अद्याप ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. वडणेरभैरव पोलीस व सोमा टोलवेज कंपनीचे अपघातग्रस्त पथक घटनास्थळी पोहचले आहे. या अपघातानंतर काही वेळ महामार्ग ठप्प झाला होता.
अपघातातील मयत हे नाशिककडून धुळे येथे चालले होते, ते धुळे जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. या अपघातामध्ये धुळ्याचे भाजप नगरसेवक किरण आहिरराव यांचाही जागीत मृत्यू झाला आहे.
हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भाजप नगरसेवक किरण आहिरराव यांच्या अपघाती मृत्यूमुळे धुळ्याच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.





