विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून ‘या’ 3 नेत्यांच्या नावाची चर्चा; कोणावर होणार शिक्कामोर्तब?

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. येत्या 12 जुलै रोजी मतदान पार पडणार आहे. यादरम्यान विधान परिषदेवर कोणाला पाठवावे यासाठी काँग्रेसमध्ये तिघांच्या नावाची चर्चा आहे. यामध्ये नसीम खान, माणिकराव ठाकरे, मुझ्झफर हुसेन यांचा समावेश आहे. काँग्रेस हायकमांड लवकरच या तीनपैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार आहेत.
विधानसभेतील सध्याचे संख्याबळ लक्षात घेता भाजपचे पाच आमदार सहज निवडून येऊ शकतात. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाचे प्रत्येकी दोन आमदार निवडून येतील. काँग्रेसचा एक आमदार निवडून येऊ शकतो. शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या दोन्ही पक्षाच्या मदतीतून एक उमेदवार निवडून येऊ शकतो. भाजपने सहावा उमेदवार दिला तरच निवडणूक लागू शकते; अन्यथा विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होऊ शकते.
कोणत्या आमदारांचा कार्यक्राळ संपणार
मनीषा कायंदे (शिवसेना, शिंदे गट), भाई गिरकर (भाजप), निलय नाईक राष्ट्रवादी, (अजित पवार गट), बाबाजानी दुरानी (राष्ट्रवादी अजित पवार गट), अनिल परब (शिवसेना, ठाकरे गट), रमेश पाटील (भाजप), वजहत मिर्झा (काँग्रेस), रामराव पाटील (भाजप), प्रज्ञा सातव (काँग्रेस), महादेव जानकर (रासप), जयंत पाटील (शेकाप)





