Fire department: अरुंद रस्ते अग्निशमन दलासाठी डोकेदुखी! शहराच्या विकासतही अग्निशामककडे दुर्लक्ष
भुयारी मार्ग, अतिक्रमणे, उपकेंद्रांच्या कमतरतेमुळे बंबांना घटनास्थळी पोहोचण्यात अडथळे

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात आगीच्या घटनांचे प्रमाण लक्षवेधी ठरत आहे. गेल्या १३ दिवसांत शहरात तब्बल १६० ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांमुळे ७५ ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. आगीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाच्या तत्परतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
इंजेक्शन मोल्डींग मशिन असलेल्या कंपनीला शुक्रवारी (दि. १३ नोव्हेंबर) रोजी आग लागल्याची घटना शुक्रवारी दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत अरुंद रस्त्यांमुळे आगीचा बंब घटनास्थळी पोचण्यास उशीर झाला. सुदैवाने या घटनेत काणीही जिवितहानी झाली नाही.
मात्र या घटनेमुळे शहरातील गावठाण भागांमधील अरुंद रस्ते, रस्त्यांवरील वाहनांचे पार्किंग, घरांच्या रस्त्यावर आलेल्या पाय-या आणि अतिक्रमणांमुळे अग्निशमन बंबाला घटनास्थळी पोहोचणे कठीण होत आहे. त्यातच महामार्गांवरील भुयारी मार्गांतून बंबांना प्रवेश करता येत नसल्याने लांबचा वळसा घालावा लागतो. उपकेंद्रांची कमतरताही या समस्येत भर घालत आहे.
शहराचा विस्तार वेगाने झाला आहे. नव्या भागांमध्ये मोठ्या इमारती उभ्या राहत आहेत. मात्र, काळेवाडी, चिंचवडेनगर, चिखली, निगडी, भोसरी, थेरगाव, वाल्हेकरवाडी यासह जुन्या गावठाण भागांमध्ये आजही अरुंद रस्त्यांची समस्या कायम आहे. अनेक ठिकाणी दोन वाहनांना एकाच वेळी ये-जा करणेही शक्य होत नाही. अशा रस्त्यांवर घराला किंवा दुकानाला आग लागल्यास अग्निशमन बंब घटनास्थळी नेणे मोठे आव्हान ठरते.
या अरुंद रस्त्यांवर नागरिक आपली दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी करतात. काही घरांच्या पाय-या रस्त्याच्या हद्दीत पुढे आलेल्या आहेत. त्यामुळे रस्त्याची उपलब्ध रुंदी आणखी कमी होते. अतिक्रमणांमुळे बंबाला वळण घेणेही कठीण होते. परिणामी, आग लागलेल्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब होतो. अनेकदा रुग्णवाहिकेलाही अशाच अडचणींचा सामना करावा लागतो.
शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी महापालिकेने पुणे-मुंबई महामार्गासह विविध प्रमुख मार्गांवर भुयारी मार्ग उभारले आहेत. मात्र, या भुयारी मार्गांमधून अग्निशमन दलाचे मोठे बंब जाऊ शकत नाहीत. त्यामुळे महामार्गाच्या एका बाजूला आग लागल्यास दुसऱ्या बाजूच्या अग्निशमन केंद्रातून येणाऱ्या बंबाला थेट मार्ग उपलब्ध होत नाही. त्याला पर्यायी मार्गाने लांबचा वळसा घालून घटनास्थळी पोहोचावे लागते. त्यामुळे महत्त्वाचा वेळ खर्च होतो.
दुसरीकडे, शहराची लोकसंख्या आणि भौगोलिक विस्तार वाढत असताना अग्निशमन दलाची उपकेंद्रेही पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक आहे. मात्र, अनेक भागांमध्ये उपकेंद्र नसल्याने दूरच्या केंद्रातून अग्निशमन वाहन पाठवावे लागते. वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवरील अडथळ्यांमुळे घटनास्थळी पोहोचण्यास आणखी विलंब होतो.
गेल्या १३ दिवसांतील १६० आगींच्या घटना आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झालेल्या ७५ घटनांनी शहरातील अग्निसुरक्षेचा प्रश्न अधोरेखित केला आहे. आगीच्या दुर्घटनेत सुरुवातीची काही मिनिटे अत्यंत महत्त्वाची असतात. या काळात अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचल्यास आगीचा फैलाव रोखण्यास मदत होते.
मात्र, अग्निशमन वाहनांच्या मार्गातच अडथळे निर्माण होत असतील, तर आपत्ती व्यवस्थापनासमोर मोठे आव्हान उभे राहते. त्यामुळे महापालिकेने गावठाण भागांतील रस्त्यांचे सर्वेक्षण करून अग्निशमन वाहनांसाठी आवश्यक मार्ग मोकळे ठेवावेत.
रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंग आणि अतिक्रमणांवर कारवाई करावी. भुयारी मार्गांची उंची व पर्यायी मार्गांचा आपत्कालीन वापर लक्षात घेऊन नियोजन करावे. तसेच लोकसंख्या आणि अंतराच्या निकषांनुसार नवीन अग्निशमन उपकेंद्रे उभारावीत. शहराचा विकास करताना वाहतूक व्यवस्थेबरोबरच आपत्कालीन सेवांसाठीही अडथळामुक्त मार्ग उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
शहरातील महत्वाच्या घटना
- २४ ऑक्टोबर २०२४ पाण्याची टाकी कोसळून पाच मजूरांचा मृत्यू
- ८ डिसेंबर २०२३ ज्योतिबानगर तळवडे येथील आगीत सहा जणांचा मृत्यू
- ३० ऑगस्ट २०२३ पूर्णानगर, चिखली येथील आगीत चार जणांचा मृत्यू
- १३ नोव्हेंबर २०१७ एलपीजी गॅस रिफिलिंग करताना स्फोट; एकाचा मृत्यू
- २७ ऑगस्ट २००८ साई इंडस्ट्रीज कंपनीला आग; ११ मृत्यूमुखी
याकडेही हवे लक्ष…
- तेरा दिवसांत शहरात १६० आगीच्या घटना
- लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांमुळे ७५ ठिकाणी आग
- गावठाणातील अरुंद रस्ते अग्निशमन दलासाठी डोकेदुखी
- रस्त्यांवरील पार्किंगमुळे बंबाच्या मार्गात अडथळे
- घरांच्या ओट्यांमुळे रस्त्यांची रुंदी आणखी कमी
- रुग्णवाहिकांनाही अरुंद रस्त्यांतून प्रवेश करणे कठीण
- पुणे मुंबई महामार्गाच्या भुयारी मार्गांतून अग्निशमन बंबांना प्रवेश नाही
- महामार्ग ओलांडण्यासाठी बंबांना मारावा लागतो वळसा
- उपकेंद्रांच्या कमतरतेमुळे घटनास्थळी पोहोचण्यास विलंब
- अग्निशमन वाहनांसाठी अतिक्रमणमुक्त मार्गांची गरज
दिनांक आगीच्या घटना
- ०१ नोव्हेंबर ०३
- ०२ नोव्हेंबर ०३
- ०३ नोव्हेंबर ०४
- ०४ नोव्हेंबर ०१
- ०५ नोव्हेंबर ०२
- ०६ नोव्हेंबर ०५
- ०७ नोव्हेंबर ०९
- ०८ नोव्हेंबर ७५
- ०९ नोव्हेंबर २६
- १० नोव्हेंबर १६
- ११ नोव्हेंबर ११
- १२ नोव्हेंबर ०३
- १३ नोव्हेंबर ०२
Vadgaon Maval : दुःखाच्या सावटात वडगावकर एकवटले; गावाच्या सेवेत रुग्णवाहिका दाखल





