Narhari Zirwal : नरहरी झिरवाळ यांचे पीए डॉ. गाडे यांचे निलंबन; मुख्यमंत्री कार्यालयातून आदेश जारी
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांचे तत्कालीन खासगी सचिव डॉ. रामदास गाडे यांच्यावर अखेर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे.

Narhari Zirwal : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांचे तत्कालीन खासगी सचिव डॉ. रामदास गाडे यांच्यावर अखेर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे. बेकायदेशीर धाड प्रकरणी थेट मुख्यमंत्री कार्यालयातून हालचाली झाल्याने हा मोठा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी ३० ऑक्टोबर रोजी एफडीएच्या चार अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते, त्यानंतर आता या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार मानले जाणारे डॉ. गाडे यांचाही नंबर लागला आहे. डॉ. रामदास गाडे हे मूळचे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागाचे अधिकारी असून ते तिथे साहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते. मात्र, उसनवारी तत्वावर त्यांची अन्न व औषध प्रशासन खात्यात मंत्री नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांचे खासगी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
बेकायदेशीर धाडीच्या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता धक्कादायक बाबी समोर आल्या. डॉ. गाडे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचारी यंत्रणेवर प्रचंड दबाव आणला होता. त्यांनी अधिकाऱ्यांना बेकायदेशीर निर्देश देऊन कायद्याच्या कसोटीवर न टिकणारी कारवाई करण्यास भाग पाडले, असा गंभीर ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
चौकशी अहवालात डॉ. गाडे दोषी आढळल्यानंतर त्यांच्या निलंबनाची शिफारस करण्यात आली होती. विशेष म्हणजे, हा निलंबनाचा प्रस्ताव सुरुवातीला खुद्द मंत्री नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्याकडेच गेला होता आणि तिथून तो मुख्यमंत्री कार्यालयात पाठवण्यात आला. मात्र, डॉ. गाडे यांचा मूळ विभाग पशुसंवर्धन असल्याने, त्यांची स्वतंत्र फाइल सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आल्या होत्या.
त्यानुसार पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाने राज्य सरकारकडे निलंबनाचा प्रस्ताव पाठवला. हा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयात काही दिवस प्रलंबित होता, मात्र अखेर मुख्यमंत्री कार्यालयाने हिरवा कंदील दाखवताच पशुसंवर्धन विभागाने डॉ. रामदास गाडे यांच्या निलंबनाचे अधिकृत आदेश जारी केले आहेत.






