“ठाण्यात सुटलाय तुफान वारा.. घड्याळात तुमच्या आता वाजणार बारा” जितेंद्र आव्हाडांना नरेश म्हस्के यांचा सूचक इशारा

मुंबई – शिंदे गटाचे प्रवक्ते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टची सध्या संपूर्ण ठाण्यात चर्चा आहे. म्हस्के हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. सोशल मीडियावर एक कविता पोस्ट करत म्हस्के यांनी राष्ट्रवादीतुन आऊटगोईंग सुरु होणार असल्याचा सूचक इशारा दिला आहे.
“ठाण्यात सुटलाय तुफान वारा.. १२ तारखेला कुणाचे वाजणार बारा ? बाळासाहेबांच्या सेनेकडे झुंडीने येऊ लागले, राष्ट्रवादीचे नगरसेवक कुणाला ‘आव्हाइड’ करु लागलेत ?” अशा आशयाची पोस्ट नरेश म्हस्के यांनी केली आहे. या चार ओळींमधून म्हस्के यांनी राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांना सूचक इशारा दिला आहे.
आपल्या दुसऱ्या पोस्टमध्ये नरेश म्हस्के यांनी थेट जितेंद्र आव्हाड यांचे नाव घेतले आहे. ते म्हणतात,”एक आला, दोन आले,हा ओघ राहील निरंतर आव्हाडांच्या अरेरावीला नगरसेवकांचे चोख उत्तर ! कितीही बोला, कुणासही टोले मारा.. घड्याळात तुमच्या आता वाजणार बारा”
एक आला, दोन आले,
हा ओघ राहील निरंतर
आव्हाडांच्या अरेरावीला
नगरसेवकांचे चोख उत्तर !
॰॰॰॰॰
कितीही बोला, कुणासही टोले मारा
घड्याळात तुमच्या आता वाजणार बारा pic.twitter.com/pceMaPYlS2— Naresh Mhaske (@nareshmhaske) February 10, 2023
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड वारंवार एकनाथ शिंदेंवर टीका करत असतात त्यामुळे सध्या ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. अशात राष्ट्रवादीचे काही नगरसेवक शिंदे गटात दाखल होणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का देणार असल्याचा सूतोवाच नरेश म्हस्के यांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला आहे.





