जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांची 538 कोटींची संपत्ती जप्त

नवी दिल्ली – जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेडशी संबंधित कथित मनी लॉंड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने 538 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या मालमत्तांमध्ये जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल, पत्नी अनिता गोयल आणि मुलगा निवान गोयल यांच्यासह लंडन, दुबई आणि भारतातील विविध राज्यांमधील कंपन्या आणि व्यक्तींच्या नावावर नोंदणीकृत 17 निवासी सदनिका, बंगले आणि व्यावसायिक इमारतींचा समावेश आहे.
केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने मनी लॉंडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), 2002 अंतर्गत ही कारवाई केली. नरेश गोयल यांच्याशिवाय जेटएअर प्रायव्हेट लिमिटेड आणि जेट एंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेडच्या नावावर काही मालमत्ता नोंदणीकृत आहेत.
कॅनरा बॅंकेने दाखल केलेल्या कथित फसवणूक प्रकरणात ईडीने मंगळवारी नरेश गोयल आणि इतर पाच जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. बॅंकेने एफआयआरमध्ये जेट एअरवेजला 848 कोटी रुपयांपर्यंतची क्रेडिट मर्यादा आणि कर्ज मंजूर केल्याचा आरोप केला आहे. त्यापैकी 538 कोटी रुपये थकीत आहेत. दरम्यान, नरेश गोयल यांना ईडीने 1 सप्टेंबर रोजी पीएमएलए अंतर्गत अटक केली होती. त्यांना मुंबईतील आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले आहे.



