मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात राहणार जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल; घरचे जेवण, आरामदायी बेडची केली मागणी

मुंबई – कॅनरा बँकेची (canara bank) 538 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेले जेट एअरवेजचे (jet airways) संस्थापक नरेश गोयल (naresh goyal) यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांना आता मुंबईतील आर्थर रोड कारागृहात रहावे लागणार आहे. यासाठी गोयल यांनी स्वत: न्यायालयात अर्ज केला होता. त्यांनी म्हंटले होते की, त्यांना तळोजाऐवजी आर्थर रोड कारागृहात (arthur road jail) पाठवा. पीएमएलएच्या विशेष न्यायालयाने नरेश गोयल यांची ही याचिका स्वीकारली असून त्यांना आता मुंबईतील आर्थर रोड कारागृहात पाठवण्यात आले.
चौकशीनंतर ईडीने नरेश गोयल यांना पीएमएलए अंतर्गत 1 सप्टेंबर रोजी अटक केली होती. ईडीच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर गोयल यांना गुरुवारी विशेष न्यायाधीश एम.जी.देशपांडे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. तपास यंत्रणेने गोयल यांच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती केली नाही. त्यानंतर न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
नरेश गोयल यांनी त्यांना नवी मुंबईतील तळोजा कारागृहाऐवजी आर्थर रोड कारागृहात पाठवण्याची विनंती केली. गोयल यांनी नंतर असाही अर्ज दाखल केला की त्यांना अनेक आरोग्य समस्या आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या वैयक्तिक डॉक्टरांकडून दैनंदिन वैद्यकीय तपासणी करण्याची परवानगी द्यावी आणि कारागृहात असताना नियमित वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये उपचार सुरू असल्याचे त्यांनी अर्जात म्हटले आहे.
गोयल यांनी दुसर्या एका अर्जात आजारपणाचे कारण देत आरामदायक बेड आणि घरी शिजवलेले अन्न देण्याची विनंती केली आहे. गोयल यांच्या अर्जावर न्यायालयाने सरकारी वकिलांना उत्तर देण्यास सांगितले आहे.
दरम्यान, कॅनरा बँकेची 538 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नरेश गोयल, त्यांची पत्नी अनिता आणि कंपनीच्या काही अधिकाऱ्यांविरुद्ध सीबीआयच्या एफआयआरनंतर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. बँकेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी जेट एअरवेजला 848.86 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. त्यापैकी 538.62 कोटी रुपये थकबाकी आहे.





