Baramati : नरेंद्र मोदी यांचा बारामती दौरा स्थगित
Baramati : विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात उभारण्यात आलेल्या प्रेरणास्थळाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्याचे नियोजन होते.

बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ३ नोव्हेंबर रोजी नियोजित असलेला बारामती दौरा स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विद्या प्रतिष्ठानच्या परिसरातील ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनाचा कार्यक्रमही पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. दौऱ्याची नवीन तारीख अद्याप निश्चित झालेली नसल्याने बारामतीकरांना पंतप्रधानांच्या भेटीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात उभारण्यात आलेल्या प्रेरणास्थळाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्याचे नियोजन होते. या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध यांचा नऊ फूट उंच आणि सुमारे चार टन वजनाचा पुतळा उभारण्यात आला आहे. याशिवाय विविध महापुरुषांच्या जीवनकार्याची माहिती देणारी चित्रेही प्रदर्शित करण्यात आली आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी विद्या प्रतिष्ठानमधील कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) केंद्राची पाहणी करणार होते.
तसेच एआय क्षेत्रात कार्यरत विद्यार्थी आणि स्टार्टअप उपक्रमांशी संबंधित तरुणांशी संवाद साधण्याचाही कार्यक्रम प्रस्तावित होता. यासाठी संस्थेच्या परिसरात तयारी सुरू होती. दरम्यान, दौरा स्थगित झाल्याची माहिती समोर आली असली, तरी त्यामागील अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संसदेच्या संभाव्य अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दौरा पुढे ढकलण्यात आला आहे का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मात्र, यासंदर्भात अधिकृत पुष्टी झालेली नाही. आता पंतप्रधान कार्यालयाकडून दौऱ्याच्या नव्या तारखेबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.





