Narendra Modi : कुवेतच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने पंतप्रधान मोदींचा सन्मान

कुवेत सिटी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार ऑर्डर ऑफ मुबारक अल-कबीर प्रदान करण्यात आला आहे. कुवेतचे अमीर शेख मशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबा यांनी पंतप्रधानांना हा पुरस्कार प्रदान केला. या प्रसंगी कुवेतचे पंतप्रधान शेख अहमद अल-अब्दुल्ला अल-अहमद अल-सबा देखील उपस्थित होते.
पंतप्रधानांनी हा पुरस्कार भारत आणि कुवेत यांच्यातील दीर्घकालीन मैत्रीला, कुवेतमधील भारतीय समुदायाला आणि १.४ अब्ज भारतीय नागरिकांना समर्पित केला. ४३ वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानांच्या कुवेत भेटीवेळी प्रदान करण्यात आलेल्या या पुरस्काराला विशेष महत्त्व आहे.
हा पुरस्कार १९७४ पासून प्रदान करण्यात येत असून तो निवडक जागतिक नेत्यांना देण्यात आला आहे. हा पुरस्कार यापूर्वी बिल क्लिंटन, प्रिन्स चार्ल्स आणि जॉर्ज बुश यांसारख्या परदेशी नेत्यांना देण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींना देण्यात आलेला हा २० वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.





