Narendra Modi : गॅस सिलिंडरवरून राजकारणाचा भडका ! ‘या’ नेत्याने केली मोदींच्या राजीनाम्याची मागणी
गॅस सिलिंडर दरवाढीवरून राजकारणाचा भडका उडाला आहे. विरोधकांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीकेची जोरदार झोड उठवली आहे.

Narendra Modi : गॅस सिलिंडर दरवाढीवरून राजकारणाचा भडका उडाला आहे. विरोधकांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीकेची जोरदार झोड उठवली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तर थेट मोदींच्या राजीनाम्याची मागणी केली. आताची गॅस सिलिंडर दरवाढ देशातील सर्वच कुटूंबांची चिंता वाढवणारी आहे.
जनसामान्यांना आधीपासूनच सततच्या महागाईचा मुकाबला करावा लागत आहे. अशात त्यांच्या स्वयंपाकघरांवरील ताण आणखी वाढणार आहे. ही महागाई म्हणजे परराष्ट्र धोरणाशी संबंधित चुकीच्या निर्णयांचा परिणाम आहे. तशा निर्णयांच्या आर्थिक परिणामांची जबाबदारी मोदींनी स्वीकारावी. त्यांनी देशाची माफी मागून राजीनामा द्यावा, अशी तीव्र प्रतिक्रिया कॉंग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी दिली.
दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही नेहमीच्या आक्रमक शैलीत भूमिका मांडली. कुठलीही पर्यायी व्यवस्था न करता सिलिंडरच्या दरांमध्ये मनमानी पद्धतीने वाढ करण्यात आली. आधीच विचार, नियोजन का केले जात नाही, असा सवाल त्यांनी केला. तसेच, सिलिंडर दरवाढीविरोधात निदर्शने करण्याची सूचना त्यांनी तृणमूल कॉंग्रेसच्या महिला शाखेला केली.





