Narendra Modi | पंतप्रधान मोदी यांची झेलेन्स्की यांच्याशी फोनवरून चर्चा

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी संवाद साधला. युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणासाठी भारत सर्वतोपरी योगदान देण्यास वचनबद्ध आहे, असे झेलेन्स्की यांच्याशी फोनवरून झालेल्या संभाषणानंतर पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.पंतप्रधान मोदी यांच्याशी सर्व महत्वाच्या विषयांबाबत चर्चा केली. युक्रेनच्या जनतेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचा आभारी आहे. भारत आमच्या शांतता प्रयत्नांना पाठिंबा देत आहे हे महत्वाचे आहे, असेही त्यांनी आवर्जुन नमूद केले.
अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी बोलून आणि अलिकडच्या घडामोडींबद्दल त्यांचे दृष्टिकोन ऐकून आनंद झाला. संघर्षाच्या लवकर आणि शांततापूर्ण निराकरणाच्या गरजेबाबत मी भारताची सुसंगत भूमिका मांडली, असे पंतप्रधान मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात रशिया-युक्रेन संघर्षावरील तोडग्याबाबत प्रत्यक्ष चर्चा होणार आहे. त्यापुर्वी झेलेन्स्की आणि मोदींमध्ये ही फोनवरून चर्चा झाली.
मोदी आणि झेलेन्स्की यांच्यात रशियावरील निर्बंधांबाबत देखील चर्चा झाली. रशियाकडून ऊर्जेची, विशेषतः तेलाची निर्यात मर्यादित करणे आवश्यक आहे, असे झेलन्स्की यांनी म्हटले आहे. रशियावर ठोस प्रभाव असलेल्या प्रत्येक नेत्याने रशियाला युद्धबंदीशी संबंधित संकेत पाठवणे महत्वाचे आहे, असे ते म्हणाले.





