Narendra Modi : बिम्स्टेक परिषदेसाठी मोदी थायलंडला रवाना

नवी दिल्ली : बिम्सस्टेक गटाच्या 6 व्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी थायलंडला रवाना झाले आहेत. दोन दिवसांच्या या भेटीदरम्यान ते थायलंडच्या पंतप्रधान पॅटोग्टार्न शिनावात्रा यांच्याशीही चर्चा करणार आहेत. थायलंडमधील भारतीय समुदायाकडून मोदींचे भव्य स्वागत केले जाईल आणि ते शिनावात्रा यांच्यासोबत सरकारी भवनात होणाऱ्या स्वागत समारंभालाही उपस्थित राहणार आहेत.
बंगालच्या उपसागरातील बहुआयामी तांत्रिक आणि आर्थिक सहकार्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या बिम्स्टेक गटाच्या परिषदेला उद्या संध्याकाळी सुरुवात होणार आहे. या गटामध्ये थायलंड, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, म्यानमार आणि भूतानमधील नेत्यांनी सागरी सहकार्य करारावर स्वाक्षरी केली आहे. या परिषदेमध्ये नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली, बांगलादेशचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस आणि म्यानमारच्या लष्करी संसदेचे नेते माउंग ह्लाईंग, यांच्यासह इतर नेत्यांची मोदी भेट घेणार आहेत.
बिम्स्टेकची चौथी परिषद २०१८ साली नेपाळमध्ये काठमांडू येथे झाली होती. तर पाचवी परिषद श्रीलंकेतील कोलंबो येथे २०२२ मध्ये आभासी माध्यमातून झाली होती. शुक्रवारी परिषदेच्या अखेरच्या दिवशी बिम्स्टेकचे सदस्य बँकॉक व्हिजन २०३० स्वीकारणार आहेत.





