Narendra Modi : अनेक संघटनांवर दिमागी नक्षलींचा ताबा; पंतप्रधान मोदींचे मोठं वक्तव्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पुन्हा दिमागी नक्षलींचा मुद्दा उपस्थित करत राजकीय विरोधकांवर निशाणा साधला.

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पुन्हा दिमागी नक्षलींचा मुद्दा उपस्थित करत राजकीय विरोधकांवर निशाणा साधला. जंगलांमधून सशस्त्र नक्षलवादी नाहीसे झाले आहेत. मात्र, दिमागी नक्षलींनी अनेक संघटनांवर ताबा मिळवला आहे, असे त्यांनी म्हटले.
मोदींनी (Narendra Modi) सुरक्षा जवानांसमवेत दिवाळी साजरी करण्याची परंपरा यंदाही कायम ठेवली. त्यासाठी ते रविवारी छत्तीसगढच्या बस्तरमधील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) छावणीत दाखल झाले. त्यांनी जवानांना उद्देशून भाषण केले. माओवादी दहशतीची समाप्ती म्हणजे देशाच्या योग्य धोरणांचा आणि मजबूत राजकीय इच्छाशक्तीचा विजय आहे.
केंद्र सरकारच्या निर्णयांमुळे नक्षली आणि फुटीरतावाद्यांच्या निधी पुरवठ्याला तगडे हादरे बसले. नक्षलवाद्यांना पायबंद घालण्यात आला आहे. मात्र, पूर्ण धोका अद्याप टळलेला नाही. आजही दिमागी नक्षली राज्यघटना आणि लोकशाहीविरोधात जनतेला चिथावत आहेत. दिमागी नक्षलींनी अनेक राजकीय पक्षांत आणि वेगवेगळ्या संघटनांमध्ये शिरकाव केला आहे. त्यांना ओळखून पराभूत करायला हवे. तसेच, देश सुरक्षित बनवायला हवा, असे भाष्य त्यांनी केले.
देशात वर्ष २००४ ते २०१३ या कालावधीत जितके नक्षली मारले गेले; त्यापेक्षा अधिक सुरक्षा जवान शहीद झाले. त्यावेळची सरकारे नक्षलवादाकडे कधीच बरा होऊ न शकणारा आजार म्हणून पाहत होते. मात्र, आम्ही सत्तेवर आल्यानंतर राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दूर केला. त्यामुळे वर्ष २०१४ पासून स्थिती आणि सुरक्षा दलांचे मनोधैर्य बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली.
त्यामुळे ४७ वर्षांत प्रथमच कर्तव्य बजावताना मागील वर्षभरात सीआरपीएफच्या एकाही जवानाला प्राण गमवावा लागला नाही, याकडे मोदींनी (Narendra Modi) लक्ष वेधले. मागील १२ वर्षांत देशाने केवळ नक्षली आणि फुटीरतावाद्यांविरोधात यश मिळवले नाही; तर गरिबी विरोधातील लढ्यातही मोठा विजय मिळवला. संबंधित कालावधीत देशातील सुमारे ५० कोटी जनता अतिगरिबीतून बाहेर पडले आहेत, असेही त्यांनी अधोरेखित केले.






