Narendra Modi : बंगालमध्ये सत्तापरिवर्तन अटळ; पंतप्रधान मोदी यांची ममता बॅनर्जींवर टीका
पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गुरुवारी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.

Narendra Modi : पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गुरुवारी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.
राज्यात सत्तापरिवर्तन आता अटळ असून तृणमूल काँग्रेसच्या पापांचा घडा पूर्णपणे भरला आहे, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर कडाडून टीका केली.
आसनसोल या औद्योगिक आणि कोळसा पट्ट्यात आयोजित प्रचार सभेत पंतप्रधान (Narendra Modi) बोलत होते. बंगालच्या ढासळत्या आर्थिक स्थितीवर बोट ठेवताना ते म्हणाले की, एकेकाळी देशाच्या एकूण सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) १२ टक्के वाटा उचलणाऱ्या बंगालचे योगदान आता केवळ ५ टक्क्यांवर येऊन ठेपले आहे. ही आर्थिक घसरण राज्याच्या अधोगतीचे लक्षण असल्याचे त्यांनी नमूद केले.
आसनसोलमधील स्थानिक प्रश्नांना हात घालताना पंतप्रधानांनी (Narendra Modi) सिंडिकेट राजवर प्रहार केला. आज संपूर्ण आसनसोल कोळसा आणि वाळू माफियांनी वेढले आहे. इथल्या एकेकाळच्या वैभवशाली उद्योगांनी पलायन केले असून, गुंतवणूकदार पाठ फिरवत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी भाजपचे डबल इंजिन सरकारच आवश्यक आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्राने या भागातील उद्योगांच्या पुनरुज्जीवनासाठी ४५,००० कोटी रुपयांची तरतूद केली होती, परंतु राज्य सरकारच्या अडवणुकीमुळे प्रगतीला खीळ बसल्याचा आरोपही त्यांनी केला. महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरूनही मोदींनी तृणमूल काँग्रेसला धारेवर धरले. बंगालमध्ये ॲसिड हल्ल्याच्या घटनांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचा दावा करत त्यांनी सत्ताधारी पक्ष महिलांवर अत्याचार करणाऱ्यांच्या पाठीशी उभा राहत असल्याची टीका केली.
केवळ भाजपच बंगालमधील महिलांना सुरक्षित वातावरण देऊ शकते, असे आश्वासन त्यांनी दिले. आसनसोल आणि दुर्गापूरमध्ये मेगासिटी बनण्याची प्रचंड क्षमता असून भाजप सत्तेत आल्यास या शहरांचा चेहरामोहरा बदलला जाईल, असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.






