Narendra Mann : विशेष सरकारी वकील म्हणून नरेंद्र मान यांची नियुक्ती

नवी दिल्ली : 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यामागील कटाशी संबंधित एका महत्त्वाच्या प्रकरणात केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) वतीने या खटल्याची सुनावणी करण्यासाठी सरकारने वकील नरेंद्र मान यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती पाकिस्तानी वंशाचे तहव्वुर हुसेन राणा आणि डेव्हिड कोलमन हेडली यांच्याविरुद्धच्या केसशी संबंधित आहे. या दोघांवरही 26/11 च्या हल्ल्याचा कट रचल्याचे गंभीर आरोप आहेत.
या प्रकरणाची दिल्लीतील एनआयए विशेष न्यायालय आणि संबंधित अपिलीय न्यायालयांमध्ये नरेंद्र मान हे सुनावणी करतील. त्यांना ही जबाबदारी तीन वर्षांसाठी देण्यात आली, जी या नियुक्तीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून प्रभावी मानली जाणार आहे. त्यापूर्वी खटला पूर्ण झाला तर त्यांची जबाबदारी तिथेच संपेल. राणाला भारतात आणल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करणार आहे.
दरम्यान, १९९० मध्ये दिल्ली विद्यापीठातून कायद्याचे पदवीधर असलेले मान यांनी सीबीआयचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच माजी सरन्यायाधीश एएन रे यांच्यावर आनंद मार्गिस यांच्या जीवे मारण्याच्या प्रयत्नासह अनेक महत्त्वाच्या प्रकरणे हाताळली आहेत. ते जानेवारी २०११ ते एप्रिल २०१९ दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयात सीबीआयचे विशेष सरकारी वकील होते.





