50 हजार कोटींचे मादक द्रव्य जप्त – देवेंद्र फडणवीस

नागपूर – महाराष्ट्र पोलिसांनी अलीकडच्या काळात राज्यात सुमारे ५० हजार कोटी रुपयांची मादकद्रव्ये जप्त केली आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.
एका मोठ्या कारवाईत, मुंबई पोलिसांनी अलीकडेच ३०० कोटी रुपये किमतीचे १५१ किलो मेफेड्रोन जप्त केले. नाशिक जिल्ह्यातील एमआयडीसी शिंदे गावातील एका कारखान्यावर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. मुंबईतील २२०० लहान दुकानांवर पोलिसांनी काटेकोर लक्ष ठेऊन विविध ठिकाणी कारवाई केली.
उपमुख्यमंत्र्यांनी मात्र नेमक्या कोणत्या कालावधीत ही मादकद्रव्ये जप्त करण्यात आली हे स्पष्ट केले नाही. मादकद्रव्ये बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांवर राज्य सरकार लक्ष ठेवून आहे असे ते म्हणाले. फडणवीस पुढे म्हणाले की, बंद असलेल्या कारखान्यांच्या जागा मादकद्रव्यांच्या निर्मितीसाठी वापरल्या जात असल्याचेही आम्हाला आढळून आले आहे.





