‘दोघांची नार्को टेस्ट करा, सर्व सत्य समोर येईल..’; परमवीर सिंह यांचे अनिल देशमुखांना खुलं आव्हान

Paramvir Singh | Anil Deshmukh – मनसुख हिरेन हत्या प्रकरण असो की अंबानी यांच्या अँटलिया निवासस्थानाबाहेर बॉम्ब ठेवल्याचे प्रकरण असो, त्यातील सत्य तुम्ही लपवले, सत्य परिस्थिती सांगितली नाही. तुम्हाला बोलवल्यानंतर माहिती दिली नाही, असा आरोप अनिल देशमुख करत आहेत. त्यावर परमवीर सिंह यांनी अनिल देशमुख आणि माझी दोघांची नार्को चाचणी करावी, सर्व सत्य समोर येईल, असे आव्हान दिले.
सचिन वाझे दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते की, अनिल देशमुख यांनी सांगितल्यानंतर ते वसुली करत होते. कुंदन शिंदे मार्फत अनिल देशमुख यांच्यापर्यंत पैसे पोहचवले जात होते. त्या आरोपावर बोलताना परमबीर सिंह म्हणाले की, सचिन वाझे आणि इतर अधिकाऱ्यांनी मला हा सर्व प्रकार सांगितला होता. त्यामुळेच मी मुख्यमंत्र्यांना आणि राज्यपालांना पत्र लिहिले.
हे पत्र लिहिण्यापूर्वी मी मुख्यमंत्री, शरद पवार, जयंत पाटील यांच्या कानावर हा सर्व प्रकार टाकला होता. त्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे पत्र लिहिले. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व प्रकरणाची चौकशी झाली. त्या चौकशीत अनिल देशमुख दोषी आढळले. त्यानंतर ते कारागृहात गेले.
ते पुढे म्हणाले, मी सत्य माहिती दिली नाही तर माझ्यावर कारवाई का केली नाही? अनिल देशमुख यांनी जे आरोप केले आहेत, त्यासंदर्भात त्यांनी त्यावेळी माझी चौकशी का केली नाही? माझ्यावर कारवाई का केली नाही? माझी तीन वेळा एनआयएकडे चौकशी झाली. त्या चौकशीत काहीच आढळले नाही.
त्यामुळे आता आपण दोघे नार्के टेस्ट करु या, असे परमबीर सिंह यांनी म्हटले आहे. सचिन वाझे पुन्हा पोलीस दलात अनिल देशमुख यांच्या आदेशानंतरच आले होते, असे त्यांनी सांगितले.





