Narayangaon News : ‘बोगस’ मतदारांचा सुळसुळाट? मतदार यादी दुरुस्तीच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

प्रभात वृत्तसेवा
नारायणगाव – जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असताना, नारायणगाव येथील मतदार यादीत असलेल्या बोगस मतदारांची नावे वगळण्यात यावीत या मागणीसाठी अर्थसंपदा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश मेहेत्रे यांनी जाहीर केलेले लाक्षणिक उपोषण स्थगित केले आहे. तहसीलदारांनी मतदार यादी दुरुस्त करण्यासाठी लेखी सूचना दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.बोगस, परप्रांतीय, दुबार, शेजारील गावातील मतदार, इतर जिल्ह्यातील व तालुक्यातील मतदार, लग्न होऊन गेलेल्या मुली, कायमस्वरूपी स्थलांतरित आणि मयत मतदारांची नावे वगळण्यात यावीत,
अशी मागणी मेहेत्रे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. त्यानुसार सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (जुन्नर विधानसभा) ए.बी. गवारी यांनी नारायणगाव ग्रामपंचायत हद्दीतील मंडलाधिकारी, बीएलओ, पर्यवेक्षक आणि ग्राम महसूल अधिकारी यांना अति तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. विधानसभा यादी भाग क्रमांक २६८ ते २७५, ३०१ ते ३१० मधील मतदार याद्यांचे अवलोकन करून ग्रामसभेत चर्चा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.





