पुणे जिल्हा | नारायणगाव-खोडद रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे

नारायणगाव, (वार्ताहर) – नारायणगाव शहरातील प्रमुख रहदारीचा खोडद रस्ता काँक्रिटीकरणासाठी सज्ज झाला असून बहुचर्चित नारायणगावकरांची प्रतीक्षा पूर्णत्वास येत आहे. नारायणगाव, खोडद आठ किलोमीटर लांबीचा प्रमुख जिल्हा मार्ग असून आमदार अतुल बेनके यांनी रस्त्याच्या कामासाठी 10 कोटींचा निधी मंजूर केला होता.
खोडदवरून नारायणगावच्या दिशेने रस्त्याचे काम पूर्ण झाले असून शेवटच्या टप्प्यातील 400 मिटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाले आहे.
नारायणगाव शहरातून खोडदकडे जाणार्या 400 मीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार असून रस्त्याचे काम दर्जेदार करणार असल्याचे डी. जी. बेल्हेकर इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सर्वेसर्वा सोपान बेल्हेकर यांनी सांगितले.
नारायणगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 (जुना) पासून 400 मीटर लांबीचा रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. रस्त्याची एकूण रुंदी 11 मीटर असून त्यापैकी 7 मीटर रुंदीचा रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला एक मीटरचे गटार व एक मीटरचे पेव्हर ब्लॉक बसवण्यात येणार आहे. खोडद रस्ता रहदारीचा असल्याने सुरुवातीला रस्त्याची एक बाजू पूर्ण करण्यात येणार आहे.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गापासून शून्य ते 170 मीटर लांबीच्या रस्त्याचे खोदकाम करून महामार्गाच्या (जुन्या) रस्त्याला समांतर उंचीचा बनविण्यात येईल. रस्ता दर्जेदार होणार असल्याने पुढील 10 ते 15 वर्षे रस्ता सुस्थितीत राहील, असे बेल्हेकर यांनी नमूद केले.
काँक्रिटीकरण होत असलेल्या रस्त्यावर नारायणगाव ग्रामपंचायतीने झाडे लावलेली आहेत. जी झाडे काँक्रिटीकरण रस्त्याच्या बांधकामात अडचणीची ठरत आहे अशा झाडांचे पेव्हर ब्लॉक हद्दीत पुनर्रोपण करण्यात येईल.
पुनर्रोपण करता येत नसलेल्या झाडांच्या जागी स्वखर्चाने ग्रामपंचायतीच्या सहकार्याने नवीन झाडे लावण्यात येतील, असे कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
नारायणगावकरांनी सहकार्य केले
नारायणगाव शहरातील खोडद रस्ता वाहतुकीचा व वरदळीचा असून मुख्य बाजारपेठेचा आहे. खोडद रस्त्यावर बाजारपेठ असल्याने वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी होत होती.
रस्ता मोठा व काँक्रिटीकरण होणार असल्याने व्यापार्यांनी व स्थानिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतली. रस्त्याची मोजणी चालू झाल्यापासून नारायणगावकरांनी चांगले सहकार्य केले असल्याची भावना बेल्हेकर यांनी व्यक्त केली आहे.
काँक्रिटीकरण होणारा 400 मीटर लांबीचा रस्ता नारायणगाव ग्रामपंचायत हद्दीत येत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग गावातील सुविधांवर खर्च करू शकत नाही. ग्रामपंचायतने भविष्यातील दूरदृष्टीकोन ठेवून नियोजन केल्यास भविष्यात अडचण निर्माण होणार नाही.
त्यासाठी पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन, पथदिव्यांसाठी केबल व अन्य सुविधांची तरतूद करावी. त्यामुळे रस्ता दीर्घकाळ टिकेल. – सोपान बेल्हेकर, सर्वेसर्वा, डी. जी. बेल्हेकर इन्फ्रा प्रा. लि.
रस्ता एक समांतर होणार
खोडद रस्ता रहदारीचा व बाजारपेठ असल्याने पार्किंगची अडचण होऊ नये यासाठी गटारीच्या बांधकामावर हेवी ड्युटी स्लॅब टाकण्यात येणार आहे.
त्यामुळे सात मीटर काँक्रिटीकरण रस्त्याच्या दोन्ही बाजूने एक मीटर रुंदीची गटार व एक मीटर रुंदीचा पेवर ब्लॉक असा एकूण 11 मीटर रुंदीचा रस्ता एक सारखा ठेवण्यात येणार आहे.
खोडद रस्त्याचे काँक्रिटीकरण होत असल्याने मला आनंद आहे. भविष्यातील अडचणींचा विचार करून ग्रामपंचायतला कराव्या लागणार्या सुविधांची तरतूद करण्यात येईल. जेणेकरून रस्ता दीर्घकाळ टिकेल. वृक्षारोपणावर जास्तीत जास्त भर दिला जाईल.- योगेश पाटे, उपसरपंच





