Narayangaon Bus Stand : नारायणगाव बसस्थानकात खासगी वाहनांचा सुळसुळाट! संतप्त एस.टी. कर्मचाऱ्यांचा थेट आंदोलनाचा इशारा
Narayangaon Bus Stand : नारायणगाव बसस्थानक आवारातील बेकायदेशीर आणि बेशिस्त खाजगी पार्किंगविरोधात एस.टी. चालक-वाहकांमध्ये तीव्र संताप.

Narayangaon Bus Stand – नारायणगाव बसस्थानकाच्या आवारात खासगी वाहनधारकांकडून होत असलेल्या अनधिकृत आणि बेशिस्त पार्किंगमुळे एस.टी. चालक-वाहकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यावर तातडीने कठोर कारवाई न झाल्यास, आगामी १५ जून पासून नारायणगाव आगाराच्या प्रवेशद्वारासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेच्या वतीने एका पत्रकान्वये देण्यात आला आहे.
बसस्थानक आवारातील अनधिकृत पार्किंग रोखण्यासाठी आगार प्रशासनाने मागील आठवड्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले होते. त्यावेळी दोन दिवस तोंडी सूचना देऊन नंतर दंडात्मक कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले होते. मात्र, आजतागायत कोणतीही प्रभावी दंडात्मक कारवाई झाली नसल्याची खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे, परिसरात पोलीस चौकी असूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवासी करत आहेत. अनधिकृत पार्किंग रोखण्यासाठी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स केवळ तात्पुरती व्यवस्था ठरली आहे. खासगी वाहनधारक थेट पोलिसांसमोरच बॅरिकेड्सच्या पुढे वाहने उभी करून निघून जातात. या कारवाईत पोलिसांनी व आगार प्रशासनाने कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नये, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी केवळ बॅरिकेड्स पुरेसे नसून, पोलिसांनी नियमित व सातत्याने दंडात्मक कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
बेशिस्त पार्किंगमुळे अपघाताची भीती
बसस्थानकाच्या जागेवर चहूबाजूंनी खाजगी वाहने दिवसभर बेकायदेशीरपणे पार्क केली जातात. यामुळे एस.टी. बस प्लॅटफॉर्मवर लावताना किंवा मागे-पुढे घेताना चालकांना कसरत करावी लागत असून अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या परिसरात एखादी दुर्दैवी घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असा संतप्त सवाल चालक-वाहकांकडून उपस्थित केला जात आहे, अशी माहिती आगार प्रमुख वसंत अरगडे व सहाय्यक वाहतूक अधीक्षक तुकाराम पोवळे यांनी दिली.





