हिरव्यागार वनश्रीने नटलेले नारायणेश्वर मंदिर

सासवडला सोपानदेवांच्या समाधीचे दर्शन घेऊन पावन व्हावे, वाटेत संगमेश्वर आणि वटेश्वर या शिवमंदिरांचे दर्शन घ्यावे. मग हिरवेगार मळे बघत नारायणपूरला यावे. तर, समोरचे विहंगम दृश्य मन मोहवून घेते. पाठीमागे पुरंदर किल्ला ज्याची राखण करत आहे आणि शेजारी श्रीदत्तगुरूंचे पावन वास्तव्य आहे असे सुंदर नारायणेश्वर मंदिर दिसते.
हिरव्यागार वनश्रीने नटलेल्या या परिसरात मंजुळ घंटानाद अविरत घुमत असतो. “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ आणि “ओम नमः शिवाय’ या मंत्रांची एकत्रित नादवलये उमटत असतात. फुलांच्या आणि धूपाच्या सुवासाने आसमंत दरवळत असतो. मंदिराजवळील आल्हाददायक वातावरणाने मन अगदी प्रसन्न होते. प्राचीन वैभव मिरवत हे चालुक्यकालीन पश्चिमाभिमुख मंदिर उभे आहे. मंदिराभोवती उंच तटबंदी आहे. बाहेरच्या सभामंडपाच्या मध्यभागी नंदी आहे. आता तो भंगलेल्या अवस्थेत आहे. उजव्या बाजूला बसण्यासाठी पायऱ्या आहेत. याठिकाणी महाशिवरात्रीला कुस्त्यांचा आखाडा भरवला जातो.
मुख्यद्वारावर देवगण आणि राक्षसगण यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या आतील सभामंडप चार मोठ्या दगडी खांबांवर तोललेला आहे. दगडी जमिनीवर मध्यभागी मोठे कासव कोरलेले आहे. तसेच पितळी सुंदर नंदी आहे. खांबावर चांगावटेश्वर व चांगावटेश्वराचा श्रीधर योगी असे शिलालेख आहेत. चांगदेव व त्यांच्या शिष्यांनी मंदिरात तपश्चर्या केली होती, असे सांगतात. दक्षिणेकडील भिंतीवर दोन गणेशमूर्ती आहेत. द्वारपट्टीवर सुंदर नक्षीकाम केले आहे.
– माधुरी शिवाजी विधाटे





