Nagar | नारायणडोहचा पर्यायी पूल गेला वाहून

नारायणडोहो, (वार्ताहर): -नारायणडोहो येथील दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे नवीन पुलाच्या अपूर्ण कामामुळे पर्यायी मार्गीवरील पूल वाहून गेल्याने उक्कडगाव, मांडवा, लोणी सय्यदमीर अशा अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. नदी, नाले भरून वाहत असल्याने शेती कामे बंद पडलेली आहेत.
नारायणडोहो रस्त्याचे काम कित्येक दिवसांपासून रखडल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. अगोदरचा पूल तोडून ठेकेदाराने तुटलेल्या पुलाच्या कडेने तात्पुरता भराव टाकून रस्ता सुरू केला होता.
पण तो वाहून गेल्याने नागरिकांवर ‘आगीतून उठून फुफाट्यात पडण्याची’ वेळ आली आहे. नागरिकांची गैरसोय होत असल्याने नारायणडोहो ठेकेदाराने तुटलेल्या पुलाच्या कडेने तात्पुरता भराव टाकून रस्ता सुरू केला होता.
मूळ पूल मजबूत असल्याने त्यावरून वाहतूक सुरू होती. नारायणडोहो रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर ठेकेदाराने अगोदरचा पूल तोडून पूर्णपणे उध्वस्त केला.
मात्र, ठेकेदाराने बांधकाम विभागाचे नियम न पाळताच पावसाळा सुरू झाल्यावर रस्ता खोदण्याची व पूल तोडण्याची जी घाई केली, ती घाई पुन्हा नवीन रस्ता बनवताना व पुलाचे काम करताना दिसली नाही.
नारायणडोहो रस्त्याच्या कामाला सुरुवात होऊन सात महिने होऊन गेले. परंतु, अजूनही रस्त खोदलेला आहे. पूल तोडल्यामुळे अनेक दिवस रस्ता वाहतुकीसाठी अरुंद अवस्थेत होता. नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्याने ठेकेदाराने पुलाच्या कडेने ओढ्यातून तात्पुरता मुरूम टाकून रस्ता सुरू केला.
मात्र आता पुन्हा जोराचा पाऊस झाल्याने टाकलेला मुरूम वाहून गेला. त्यामुळे पुन्हा हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभियंता व ठेकेदारांवर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.




