नारायण राणे सर्वात श्रीमंत उमेदवार; सोने, डायमंड, जमीन अशी करोडोंची मालमत्ता

Narayan Rane| रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील जागा भाजपच्या वाट्याला आली आहे. येथून महायुतीकडून नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाला रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा दावा सोडावा लागला. त्यानंतर आता नारायण राणे यांचा सामना उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्याशी होणार आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राणे यांची 137 कोटींची संपत्ती असल्याचे जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघांमधील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत.
शपथपत्रामध्ये जाहीर केलेल्या माहितीनुसार, नारायण राणे यांची वैयक्तिक मालमत्ता 35 कोटी रुपयांची आहे. तर राणे यांच्या पत्नी निलम राणे यांच्याकडे 75 कोटींची संपत्ती आहे. राणे यांच्यासह पत्नी व कुटुंबीयांवर सुमारे 28 कोटींचे कर्ज आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न मागील आर्थिक वर्षात 49 लाख 53 हजार 207 रुपये आहे. पत्नीचे वार्षिक उत्पन्न 87 लाख 73 हजार 883 रुपये आहे. कौटुंबिक उत्पन्न 15 लाख 7 हजार 380 रुपये आहे.
नारायण राणे यांच्याकडे 1 कोटी 76 लाख 96 हजार 536 रुपयांचे 2552.25 ग्रॅम सोने, तर 78 लाख 85 हजार 371 रुपयांचे डायमंड आहेत. नीलम राणे यांच्याकडे 1 कोटी 31 लाख 37 हजार 867 रुपयांचे 1819.90 ग्रॅम वजनाचे सोने आहे. 15 लाख 38 हजार 572 रुपयांचे डायमंड आणि 9 लाख 31 हजार 200 रुपयांची चांदी आहे. हे सर्व मिळून राणे कुटुंबाकडे 9 कोटी 31 लाख 66 हजार 631 रुपयांचा किमतीचा ऐवज आहे.
पुण्यात ऑफिस, मुंबईत फ्लॅट… Narayan Rane|
नारायण राणे यांच्याकडे कणकवलीतील बंगला आणि पनवेल, वेंगुर्ला, कुडाळ, कणकवलीतील जानवलीमध्ये जमीन आहे. तर नीलम राणे यांच्याकडे पनवेल, जानवली, मालवणमध्ये गाळे, पुण्यात ऑफिस, मुंबई फ्लॅट अशी सुमारे 41 कोटी एक लाख 82,765 रुपयांचे स्थावर मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. नारायण राणे यांच्या नावावर विविध बँकांमध्ये 12 कोटींचे बँक डिपॉझिट, तर नीलम राणे यांच्या नावावर सव्वा दोन कोटींची बँक डिपॉझिट आहेत.
सहा वर्षात संपत्तीत 49 कोटींची वाढ Narayan Rane|
दरम्यान, सहा वर्षांपूर्वी राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून नारायण राणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तेव्हा त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात 88 कोटींची संपत्ती असल्याचे घोषित केले होते. त्यामुळे गेल्या सहा वर्षात त्यामध्ये 49 कोटींची वाढ झाली आहे. त्यावेळीही सात उमेदवारांमध्ये नारायण राणे सर्वात श्रीमंत उमेदवार होते.
हेही वाचा:





