पुणे जिल्हा | नारायण पाटील यांच्या राष्ट्रवादी एंट्रीने मोहिते-पाटील यांची ताकद वाढणार

अकलूज – माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला असून, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटलांचे पुतणे धैर्यशील मोहिते- पाटील यांनी भाजपविरोधात शड्डू ठोकत लोकसभेच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. लोकसभा लढवण्याचा निर्णय घेताच मोहिते-पाटलांची ताकद वाढण्यास सुरुवात झाली आहे.
करमाळा तालुक्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. नारायण पाटील यांच्या एंट्रीने करमाळा तालुक्यातून मोहिते-पाटलांना बळ मिळू शकते.
नारायण पाटील म्हणाले, मी गेली १० वर्षे मोहिते-पाटील यांच्यासोबत आहे. लोकसभेलाही धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासोबत राहणार आहे. नारायण पाटील यांच्या या भूमिकेमुळे एकनाथ शिंदेंना करमाळ्यात मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असणारे नारायण पाटील २६ एप्रिल रोजी करमाळा येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत तुतारी हाती घेणार आहेत.
यावेळी त्यांच्या गटाचे सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्य तुतारी हाती घेणार असल्याचे नारायण पाटील यांनी सांगितले. करमाळ्यात संजय शिंदे अपक्ष आमदार असले तरी त्यांची अजित पवार यांच्याशी जवळीक आहे. शिवाय त्यांचे बंधू माढाचे आमदार बबनराव शिंदे हे देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे नारायण पाटील यांना शरद पवार गटात प्रवेश करण्याची संधी मिळाली आहे.





