राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत नंदिनीला सुवर्ण

पुणे – वरिष्ठ महिला राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत अनेक वर्षांचा प्रतीक्षेनंतर महाराष्ट्राला कोल्हापूरच्या नंदिनी साळोखे रूपाने सुवर्ण पदक मिळाले आहे. मुंबईच्या डोर्फ केटल केमिकल कंपनीने नंदिनी व ब्रॉंझपदक विजेती स्वाती शिंदे यांना केलेली मदत बहुमोल ठरली आहे.
उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील 23 व्या वरिष्ठ महिला फ्री-स्टाईल राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचा दुसरा दिवसही डॉर्फ केटल केमिकल कंपनी पुरस्कृत कोल्हापूरच्या मल्लांनी गाजविला.
50 किलो वजनी गटात स्वाती शिंदेने रिपॅचेसमध्ये कमबॅक करून ब्रॉंझपदकाची कमाई केली. 53 किलो वजनी गटात नंदिनी साळोखेने सुवर्णपदकाला गवसणी घातली. तिने दिल्लीच्या ममतावर 4-0 आघाडीवर असताना चीतपट कुस्ती केली व जवळपास दोन वर्षांनंतर सुवर्णपदक जिंकले.
कोल्हापूरच्या मुरगुड कुस्ती संकुलात दादा लवटे यांचे मार्गदर्शन व डॉर्फ केटल केमिकल कंपनीचे आर्थिक सहकार्य नंदिनी व स्वातीला गेल्या 7 वर्षांपासून मिळत आहे. कंपनीने या दोघांसाठी व्यायामशाळाही उभी केली आहे. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी विजय पाटील, स्वाती शिंदे व नंदिनी साळुंखेला 60 हजारांची विशेष मदतीनिधी डॉर्फ केटलने दिला होता.





