‘एमएचटी-सीईटी’त नांदेड, पंढरपूरचा झेंडा

राखीव गटातून आदर्श अभंगे, खुल्या गटातून विनायक गोडबोले प्रथम
पुणे – अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली राज्य सामाईक प्रवेश परीक्षा अर्थात “एमएचटी-सीईटी’ ऑनलाइन प्रवेश परीक्षेच्या निकालात “पीसीएम’ ग्रुपमध्ये राखीव गटातून नांदेडचा आदर्श अभंगे आणि “पीसीबी’ ग्रुपमध्ये खुल्या गटातून पंढरपूरचा विनायक गोडबोले राज्यात सर्वप्रथम आले आहेत.
“एमएचटी-सीईटी’ राज्यातील 36 जिल्ह्यांच्या ठिकाणी 166 परीक्षा केंद्रावर ऑनलाइन पद्धतीने 10 दिवस 19 सत्रांत घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेसाठी 3 लाख 92 हजार 354 विद्यार्थी बसले होते. त्यात “पीसीएम’ विषयामध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 2 लाख 76 हजार 166 आणि “पीसीबी’ गटात 2 लाख 81 हजार 154 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एमएचटी-सीईटी परीक्षेतील गुणांच्या आधारे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश दिला जातो.
“पीसीएम’ ग्रुपचा संवर्गनिहाय निकालात अनुक्रमे खुल्या गटातून अमन पाटील आणि मुग्धा पोखरणकर, राखीव गटातून आदर्श अभंगे आणि गितांजली वारंगुळे हे विद्यार्थी राज्यात प्रथम आले आहेत. “पीसीबी’ ग्रुपमध्ये संवर्गनिहाय निकालात अनुक्रमे खुल्या गटातून विनायक गोडबोले आणि रूचा पालक्रीतवार, तर राखीव गटातून अभिषेक घोलप आणि गितांजली वारंगुळे हे विद्यार्थी राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती राज्य सीईटी सेलचे आयुक्त आनंद रायते यांनी दिली.
पर्सेंटाईलमुळे निकालच कळला नाही
यंदा प्रथमच राज्य सीईटी सेलने एमएचटी-सीईटी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली. त्याचा निकाल पर्सेंटाईल पद्धतीने जाहीर करण्यात आला. बहुतांश विद्यार्थ्यांना 90च्या पुढे पर्सेंटाईल मिळाले आहेत. मात्र पर्सेंटाईल व टक्केवारी यात मोठी तफावत आहे. राज्य सीईटी सेलने विद्यार्थ्यांची रॅंकही जाहीर केली नाही. गुणही प्रसिद्ध केले नाहीत. त्यामुळे पर्सेंटाईलमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
आदर्शला व्हायचंय कॉम्प्यूटर इंजिनिअर
राज्यात “पीसीएम’ ग्रुपमध्ये प्रथम आलेला आदर्श अभंगे हा नांदेडचा आहे. त्याचे शिक्षण किनवट येथे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले. आदर्श हा इंजिनिअरिंगमध्ये कॉम्प्युटर सायन्स शाखेत प्रवेश घेणार असल्याचे सांगितले. तसेच, “पीसीबी’ग्रुपमध्ये राज्यात पहिला आलेला विनायक गोडबोले हा पंढरपूरचा आहे. तो मेडिकल शाखेत प्रवेश घेणार असल्याचे सांगितला.





