नाना पटोलेंची राज्यपालांवर खोचक टीका; म्हणाले,”प्रत्येक राज्यात राज्यपाल, महाराष्ट्रात मात्र भाजपाल”

मुंबई : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याच वक्तव्यामुळे राज्यपाल पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. एवढेच नाही तर त्यांच्या वक्तव्याचे पडसाद हे चक्क अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसावर पडल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा राज्यपालांवर सडकून टीका केली आहे. आज ‘प्रत्येक राज्यात राज्यपाल, महाराष्ट्रात ‘भाजपाल”,असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी,”राज्यपाल कोश्यारी यांनी आधी शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. एवढ्यावरच ते न थांबता आता महात्मा जोतिबा फुले यांच्याबाबत देखील वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांना आता माघारी जावं लागेल. आम्ही त्याबाबत कायदेशीर तपासणी करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय घोष राज्यपालांना आवडत नाही त्यामुळे ते सभागृहातून निघून गेले, असे नाना पटोले म्हणाले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई यांचा अवमान केला आहे. महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान महाराष्ट्र कदापीही सहन करणार नाही, या अपमानाबद्दल राज्यपालांना महाराष्ट्राची माफी मागावीच लागेल अशी मागणी करत राज्यपाल कोश्यारी यांना परत पाठवण्यासंदर्भात विधिमंडळात ठराव आणण्यासाठी कायदेशीर बाबींचा विचार करू, असे नाना पटोले यांनी सांगितले.
पटोले म्हणाले की, विधिमंडळातील अभिभाषण अर्धवट सोडून राज्यपाल कोश्यारी निघून गेले हे राज्यपालपदाला शोभणारे नाही, त्यांनी महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचा घोर अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात करु, शिवाजी महाराजांचा जयघोष राज्यपाल कोश्यारी व भारतीय जनता पक्षाला आवडो वा ना आवडो जयजयकार कोणीही थांबवू शकत नाही. शिवाजी महाराज व महात्मा फुले तसेच सावित्रीमाईंबद्दल कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो, असे देखील पटोले म्हणाले होते.





