Nana Patole : विकासकामांऐवजी मूठभर लोकांवरच खर्च; पुरवणी मागण्यांवरून नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप

मुंबई : महायुती सरकारने राज्यात एक नवीन पायंडा पाडला आहे. महाराष्ट्र हे एक प्रगत राज्य आहे. खर्चावर मर्यादा ठेवून विकास कामांवर लक्ष केंद्रीत करणारे हे राज्य, अशी महाराष्ट्राची ख्याती होती. आपण 57 हजार कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मांडल्या. पैसे खर्च करण्याचे कोणतेही तारतम्य नाही. पैसे विकासकामांवर खर्च करण्यापेक्षा काही मूठभर लोकांवर खर्च करण्याचे धोरण या महायुती सरकारचे आहे, असा गंभीर आरोप कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्य सरकारवर केला.
विधानसभेत पुरवणी मागण्यांवर बोलताना नाना पटोले यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलायला उभे राहिलेल्या नाना पटोले यांना, तुमचा लाडकी बहीण योजनेला विरोध आहे का? असा प्रश्न विचारला. यावेळी ते म्हणाले की, आमचा लाडकी बहीण योजनेला विरोध नाही तर आमचा ए गॅंगला विरोध आहे, असे सूचक विधान केले.
मुंबईमध्ये पहिले डी गॅंग होती, आता ए गॅंग आली आहे. त्यामुळे मूठभर लोकांसाठी हे सरकार चालत आहे का? अशी भावना राज्यातील जनतेची झालेली आहे. आता उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आपला लाडकी बहीण योजनेला विरोध आहे का? आमचा लाडकी बहीण योजनेला अजिबात विरोध नाही. आम्ही आमच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहीणाला 3100 रुपये देऊ असे सांगितले होते. महायुतीने 2100 रुपये असे सांगितले होते. पण ते 1500 रुपयांवर आले आहेत, असे म्हणत त्यांनी टीका केली.
ज्यावेळी त्यांनी लाडकी बहिणीची घोषणा केली, त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि अजित पवार अर्थमंत्री होते. पण तेच आता लाडक्या बहिणीला 1500 रुपयांवरून 500 रुपयांवर आणले आहे. निवडणूकीच्या तोंडावर योजना जाहीर करताना कोणतेही निकष लावले नाहीत. मग आताच निकष का लावता?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.





