“वाल्मिक कराड सभागृहात येऊन बसला तरी आश्चर्य वाटायला नको” ; नाना पटोले विधानसभेत कडाडले

Nana Patole on Valmik Karad। आज विधानसभेत राज्यातील बीड आणि परभणीतील घटनेवर चर्चा घेण्यात आली. या चर्चेदरम्यान, काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी या दोन्ही प्रकरणावर भाष्य केले. यावेळी त्यांनी,”राज्यातील बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना महाराष्ट्राच्या भूमीला कलंक लावणारी आहे. या राज्यातील शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार संपुष्टात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे,” असे वक्तव्य काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केले.
बीडच्या प्रकरणावर बोलताना नाना पटोले यांनी ,”बीडमधील गुंड वाल्मिक कराडला पोलीस सुरक्षा देण्यात आली आहे. त्याच्यासोबत तीन पोलीस कर्मचारी असतात. ज्याच्यावर अनेक गुन्हे आहेत, अशा माणसाला पोलीस सुरक्षा का दिली जाते? गेल्या अडीच वर्षांच्या काळात राज्यात महायुतीचे सरकार होते. या सरकारने राज्यात गुंडाझमला ताकद देण्याचे काम केले” असा आरोप यावेळी नाना पटोले यांनी केले.
कराडने 200 लोकांवर गुन्हे दाखल केले Nana Patole on Valmik Karad।
वाल्मिक कराड याने गेल्या चार-पाच दिवसांत बीडमधील पोलिसांना 200 लोकांवर गुन्हे दाखल करायला लावले आहेत, अशी माहिती आहे. वाल्मिक कराड हाच तिकडे शासन चालवत आहे. त्याच्यावर कोणाचा वरदहस्त आहे? पोलीस शासनाचं ऐकतात की गुंडाचं? मी वाल्मिक कराडला गुंड म्हणत आहे कारण त्याने अनेक खून केले आहेत. विधानसभेचे आमदारही वाल्मिक कराडच्या आकाचं नाव घ्यायला घाबरत असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले.
राज्यात अडीच वर्षांपासून गुंडाराज सुरु आहे, ते अजूनही संपलं नाही. मी 1999 साली सभागृहात आलो त्यावेळी अरुण गवळी ही सभागृहात होता. त्याच्याशेजारी कोणीही बसायला तयार नव्हते. वाल्मिक कराडही या सभागृहात येऊन बसला तरी आश्चर्य वाटायला नको, असे नाना पटोले यांनी म्हटले.
नाना पटोलेंचा धनंजय मुंडे यांच्याकडे बोट Nana Patole on Valmik Karad।
पुढे नाना पटोले यांनी वाल्मिक कराड यांच्या नावाचा उल्लेख करत या प्रकरणात एक मंत्रीही सहभागी असल्याची कुजबुज रंगल्याचे सांगत पटोले यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांच्याकडे बोट दाखवले आहे. गेल्यावेळी परळीत आंधळे आणि गिते यांच्यात गोळीबार झाला. आंधळेंचा खून झाला. त्याचंही संचलन करणारा व्यक्ती वाल्मिकी कराड होता. परळीत ही घटना घडली तेव्हा पाटील आणि महाजन हे दोन पोलीस अधिकारी तिकडे होते. आता संतोष देशमुख हत्याप्रकरणातही हेच दोन अधिकारी आहेत. त्यामुळे वाल्मिक कराडच्या आदेशानेच पोलिसांची नियुक्ती होते का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामध्ये एका मंत्र्याचा सहभागी असल्याची कुजबुज रंगली आहे. मुख्यमंत्र्यांकडून या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळेल, ही अपेक्षा असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले.





