हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालावर नाना पटोले यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : हरियाणा विधानसभा निवडणूकीत काँग्रेससाठी अनुकूल आणि भाजपासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना आज जे निकाल आले ते आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहेत. सकाळी बहुतांश मतदारसंघात काँग्रेस पक्ष आघाडीवर असताना अचानक उलटे चक्र कसे फिरले? मतमोजणी केंद्रावर अनेक तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले.
हरियाणाचा विजय हा भाजपाने प्रशासनाच्या मदतीने मिळवला असल्याने हा व्यवस्थेचा विजय आणि लोकशाहीचा पराभव आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. नाना पटोले म्हणाले की, काही जिल्ह्यातील ईव्हीएम मशिनची बॅटरी ९९ टक्के चार्ज होती आणि त्याच ठिकाणी काँग्रेस उमेदवारांचा पराभव झाला व भाजपाचे उमेदवार निवडून आले.
ज्या ईव्हीएमच्या बॅटरी ६०-७० टक्के चार्ज होत्या. त्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. ईव्हीएमशी छेडछाड केल्याचे यातून स्पष्ट दिसत आहे. भारतीय जनता पक्ष लोकांच्या मनातून उतरलेला आहे, हरियाणात तर भाजपाविरोधात प्रचंड संताप दिसला. त्यामुळे गडबड करून मिळवलेला भाजपाचा हा विजय लोकशाही व्यवस्थेची हत्या करणारा आहे. यासंदर्भात काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाकडे तक्रार करेल, पण हा निकाल काँग्रेसला मान्य नाही.





