Pune District : शारदानगर कृषी विज्ञान केंद्राला अजितदादांचे नाव द्या
Pune District : शेतकऱ्यांप्रती असलेली त्यांची बांधिलकी आणि कृषी क्षेत्रासाठी दिलेले योगदान लक्षात घेता त्यांच्या नावाने कृषी विज्ञान केंद्राचे नामकरण करणे ही त्यांना योग्य आदरांजली ठरेल.

बारामती : शेतकरी, ग्रामीण विकास आणि कृषी क्षेत्रासाठी मोलाचे योगदान देणारे स्व. अजित पवार यांचे नाव शारदानगर येथील कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) ला देण्यात यावे, अशी मागणी भाजप युवा मोर्चा पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांनी जिल्हाधिकारी पुणे तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच भाजप युवा मोर्चाच्या वतीने प्रांतअधिकारी उत्तम दिघे यांनाही यासंदर्भात पत्र देण्यात आले.
भाजप युवा मोर्चाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्व. अजित पवार हे शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले नेतृत्व होते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न, सिंचन व्यवस्था, शेती विकास, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि कृषी क्षेत्रातील प्रगती यासाठी त्यांनी सातत्याने काम केले. शेतकऱ्यांप्रती असलेली त्यांची बांधिलकी आणि कृषी क्षेत्रासाठी दिलेले योगदान लक्षात घेता त्यांच्या नावाने कृषी विज्ञान केंद्राचे नामकरण करणे ही त्यांना योग्य आदरांजली ठरेल.
शारदानगर येथील कृषी विज्ञान केंद्र हे शेतकऱ्यांना आधुनिक शेती, संशोधन, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देणारे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. राज्यभरातील शेतकरी आणि युवकांसाठी हे केंद्र प्रेरणादायी ठरत असून, अशा संस्थेला एका शेतकरी पुत्राचे नाव दिल्यास कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी भाजप युवा मोर्चाने प्रशासनाला सकारात्मक भूमिका घेऊन “स्वर्गीय अजित दादा पवार कृषी विज्ञान केंद्र” असे नामकरण करण्याची मागणी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या मागणीचा गांभीर्याने विचार करून तात्काळ कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर, शहराध्यक्ष अभिषेक चिंचकर, तालुकाध्यक्ष जगदीश कोळेकर, जिल्हा उपाध्यक्ष संदीप केसकर, जिल्हा पदाधिकारी विवेक साळुंके, उपाध्यक्ष विकी आगम, रोहित शिंदे, रागू चौधर आदी उपस्थित होते.
हेही वाचा : Pune District :बारामती येथे सरपंच संमेलन उत्साहात





