Bhosale Sword Auction : नागपूरच्या भोसले घराण्याच्या तलवारीचा होणार लिलाव

नागपूर : येथील भोसले घराण्याच्या ऐतिहासिक तलवारीचा न्यूयॉर्कमधील एका ब्रोकर कंपनी मार्फत ऑनलाइन लिलाव होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही तलवार श्रीमंत राजे रघुजी भोसले यांची असल्याचा दावा केला जात आहे. प्रस्तुत तलवार केव्हा अन् कशी न्यूयॉर्कच्या ब्रोकर कंपनीकडे पोहोचली? याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. पण या तलवारीच्या इतिहासाचा मागोवा घेण्यासाठी अनेक इतिहासकार व नागपुरातील भोसले घराण्याचे वंशज उत्सुक आहेत.
ऑनलाइन ब्रोकर सोथबाय या कंपनीतर्फे ही तलवार विक्रीला ठेवली आहे. ही कंपनी ब्रिटीशांनी स्थापन केलेली बहुराष्ट्रीय कंपनी असली तरी तिचे मुख्यालय न्यूयॉर्कला आहे. कंपनीने ७ हजार ग्रेट ब्रिटन पाऊंडपासून (७.९५ लाख रुपये) लिलाव सुरू करण्यात येणार आहे. या लिलावासाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर भोसले घराण्याला देखील धक्का बसला आहे. ही तलवार आमच्याकडे परत यावी यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न असल्याची माहिती राजे मुधोजी भोसले यांनी दिली.
संबंधित तलवार कंपनीपर्यंत कशी पोहोचली हे मोठे कोडेच आहे. १८५३ ते १८६४ या कालावधीत महाराज श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोंसले (दुसरे) उर्फ (आप्पासाहेब महाराज) यांच्या नेतृत्वात मराठा विरुद्ध ब्रिटिश युध्द झाले होते. त्याच कालावधीत इंग्रजांनी ब्रिटीशांनी नागपूरकर भोसल्यांचा खजिना लुटला होता. त्यात अनेक रत्नजडित दागदागिने, शस्त्रसाठा व तलवारींची लूट करण्यात आली होती. त्या लुटीत कदाचित ही तलवार गेली असावी अशी शक्यता आहे.
तलवारीला सोन्याने जडवलेली मूठ
संबंधित तलवार ही युरोपियन शैलीतील आहे. त्यावर देवनागरी लिपीने अंकित करण्यात आले आहे. एवढेच नाही तर तिला सोन्याने जडवलेली मूठही आहे. तसेच हिरव्या विणलेल्या लोकरीची पकडही तलवारीला आहे. या तलवारीत एकेरी ब्लेड आहे. ही तलवार १२४ सेमी लांब आहे.





