Nagpur Violence : “छावा सिनेमात छ. संभाजी महाराजांची हत्या पाहिल्यानंतर लोक संतापले” – रामदास आठवले

Ramdas Athawale | Nagpur Violence : राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापला आहे. औरंगजेबाची कबर हटवण्यावरून नागपुरात महाल परिसरात सोमवारी रात्री दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. समाजकंटकांनी विविध भागात जाळपोळ करत पोलिसांवर दगडफेक केली.
यात काही पोलिस जखमी झाले असून स्थानिक नागरिकांचे देखील आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन सादर केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नागपूरमधील हिंसाचाराची सविस्तर माहिती दिली. तसेच ही घटना पूर्वनियोजित कट असून जो कोणी पोलिसांवर हल्ला करेल त्याला सोडले जाणार नाही.
राज्यात कोणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर जात-धर्म न पाहता कारवाई करण्यात येईल, असा थेट इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. तसेच राज्यातील सर्वधर्मीय नागरिकांना शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आवानही त्यांनी केले आहे.
आता या हिंसाचाराबाबत प्रतिक्रिया येत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही यावर प्रतिक्रिया देत नागपूरकरांना शांततेचे आवाहन केले आहे. याचबरोबर छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची हत्या पाहिल्यानंतर लोक संतापले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी सभागृहाबाहेर पीटीआयशी बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, “औंरगजेबाची कबर हटवण्याची मागणी बऱ्याच काळापासून होत आहे. ही कबर ५०० वर्षांपासून तिथे आहे.
छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची हत्या पाहिल्यानंतर लोक संतापले आहेत, म्हणून सर्वत्र निदर्शने होत आहेत. नागपुरात घडलेली अशी घटना दुसरीकडे कुठे घडू नये. मी लोकांना शांततेत निषेध करण्याचे आवाहन करू इच्छितो. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये.” असं ते यावेळी म्हणाले.





