नागपूर शिक्षक भरती घोटाळ्यात खळबळ; शेकडो शिक्षक सायबर पोलिसांच्या रडारवर

नागपूर : नागपूरमधील 2019 पासूनच्या शिक्षक भरती घोटाळ्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवली आहे. गणित, इंग्रजी आणि विज्ञान विषयांच्या शिक्षकांची बनावट कागदपत्रांद्वारे गैरमार्गाने भरती करून शेकडो शिक्षकांना ‘शालार्थ आयडी’ प्रदान करण्यात आले. या प्रकरणात आतापर्यंत काही अधिकाऱ्यांना अटक झाली असून, आता शेकडो शिक्षक सायबर पोलिसांच्या रडारवर आले आहेत. सायबर विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांनी सांगितले की, अनेक शिक्षकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यांची चौकशी सुरू आहे.
2014 च्या शासन निर्णयाचा गैरफायदा घेत बनावट कागदपत्रे, खोट्या स्वाक्षऱ्या आणि शिक्षण संस्थांचे बनावट प्रस्ताव तयार करून 2019 पासून शिक्षक भरती करण्यात आली. 2011 मध्ये अनुदानित शाळांच्या पडताळणीत खोटी विद्यार्थी संख्या दाखवून शिक्षकांची पदे भरल्याचे उघड झाले होते. त्यानंतर 2012 मध्ये राज्य शासनाने शिक्षक भरतीवर बंदी घातली होती. तरीही 2014 मध्ये नवीन आदेश काढून गैरमार्गाने भरती सुरू झाली. यात शिक्षकांच्या बँक खात्यांत 8 ते 10 वर्षांच्या थकबाकीच्या लाखो रुपये जमा झाल्याचे समोर आले आहे.
या घोटाळ्यात नागपूर विभागीय माजी शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांच्यावर बनावट कागदपत्रे, खोटे नियुक्तीपत्र आणि शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप आहे. सायबर पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी नोटीस बजावली असून, बुधवारी सकाळी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, जामदार सतत नवनवीन कारणे सांगून चौकशीला टाळाटाळ करत असल्याचे पोलिसांनी नमूद केले. शिक्षण विभागाने सर्व संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले असून, लवकरच आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.





