Nagpur Fire: उमरेड एमआयडीसीमध्ये भीषण आग; कामगार गंभीर जखमी

Nagpur Fire | नागपूर जिल्ह्यातील उमरेड एमआयडीसीमध्ये असलेल्या एमएमपी इंडस्ट्रीज लि. कंपनीत स्फोट झाल्याची घटना घडली. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मोठा स्फोट झाला. यात ११ कामगार गंभीर जखमी झाले असून यातील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे.
जखमींवर नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचार सुरू आहेत. मध्यरात्री १ वाजतानंतरही आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
नेमकं काय घडलं?
उमरेड एमआयडीसीत एमएमपी ही ॲल्युमिनियम फॉइल आणि पावडर तयार करणारी कंपनी आहे. ॲल्युमिनियम फॉइल आणि पावडरचा वापर पॅकेजिंगसाठी करण्यात येतो. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास या कंपनीत स्फोट झाला.
कच्च्या ॲल्युमिनियम पावडरचा उपयोग करून ॲल्युमिनियम फाॅइलला पॉलिश करण्याचे काम ज्या मशीनमध्ये केले जाते, ती मशीन हाताळत असताना अचानक स्फोट झाला. स्फोटाचा आवाज ऐकून कामगारांनी बाहेर धाव घेतली, तर काही आत अडकले. घटनेनंतर बचाव पथकाने तातडीने बचाव कार्य सुरु केले. दरम्यान, या कंपनीत एकूण ४५० कामगार आहेत. सायंकाळच्या शिफ्टमध्ये अंदाजे १५० कामगार कामावर होते. Nagpur Fire |
अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु केले. हा स्फोट इतका भयंकर होता की काही अंतरावर त्याचे हादरे बसले होते. Nagpur Fire |
हेही वाचा:
फळ एक फायदे अनेक ! ‘नाशपाती’ करेल तुमच्या सर्व रोगांचा मुळापासून नाश; वाचा आरोग्यदायी फायदे





