अहिल्यानगर : अल्पवयीन मुलासह तरूणाने आत्महत्या केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना रविवारी व सोमवारी एमआयडीसी परिसरात घडल्या आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या असून पोलीस आत्महत्येच्या कारणांचा शोध घेत आहेत.
वडगाव गुप्ता येथे एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. तन्मय गोविंद उसनाळे (रा. अनसारवाडी, ता. निलंगा, जि. लातूर, हल्ली रा. बाबासाहेब गव्हाणे यांच्या खोलीत, वडगाव गुप्ता) असे मृत अल्पवयीन मुलाचे नाव आहे. रविवारी दुपारी 4.30 वाजता तन्मय उसनाळे याने आपल्या राहत्या खोलीत लोखंडी अँगलला टॉवेलच्या सहाय्याने गळफास घेतला.
घरातील नातेवाईकांना हा प्रकार लक्षात येताच त्याला तातडीने खासगी रूग्णवाहिकेतून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सायंकाळी 6.30 वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अधिक तपास पोलीस अंमलदार पितळे करत आहेत.
एमआयडीसी परिसरातील एफ- 9 ब्लॉकला एका 28 वर्षीय तरूणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. वसंत लाल चकट (रा. एमआयडीसी) असे मयत तरूणाचे नाव आहे. सोमवारी सकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास एफ-9, एमआयडीसी येथे वसंत चकट याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. घटनेची माहिती मिळताच त्यास तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. प्राथमिक चौकशीत वसंत चकट याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.