Nagar : खिलाडूवृत्तीमुळे यशाबरोबरच अपयश पचविणेही शक्य – उपजिल्हाधिकारी सायली सोळंके

कोपरगाव : खेळ आपल्याला खिलाडूवृत्ती शिकवितो. खेळात आपण सहभागी झाले पाहिजे. कारण खेळातून मिळणारी खिलाडूवृत्ती यशाबरोबरच अपयश पचविण्याची क्षमता निर्माण करते. खेळामुळे बौद्धिक क्षमता वाढीबरोबरच, एकग्रता व सांघिक काम करण्याची सवय लागते, ती जीवनात अत्यंत महत्वाची असते, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) सायली सोळंके यांनी केले.
इंटर इंजिनिअरिंग डिप्लामा स्टूडन्टस् स्पोर्टस् असोसिएशन (आयईडीएसएसए), महाराष्ट्र राज्य प्रायोजित व संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निक आयोजित राज्यस्तरीय आंतरविभागीय मुलींच्या बॅडमिंटन व टेबल टेनिस स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी सोळंके प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर अतिथी म्हणून रोटरी क्लब कोपरगाव सेंट्रलचे अध्यक्ष राकेश काले, प्राचार्य ए.आर.मिरीकर, रजिस्ट्रार नानासाहेब लोंढे उपस्थित होते. याप्रसंगी राज्यभरातून आलेले संघ प्रमुख, दोनही स्पर्धांचे विविध पॉलिटेक्निक व डी.फार्मसी संस्थांमधून आलेल्या बॅडमिटनचे १२ संघ व टेबल टेनिसचे ९ संघ मिळून एकूण १४० खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
प्रारंभी उद्घाटनापूर्वी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी संस्थेच्या सभागृहामध्ये सोळंके व काले यांचे स्वागत करून विविध विषयांवर वैचारिक अदानप्रदान केले. कोल्हे यांनी संजीवनी अंतर्गत विविध उपलब्धींची माहिती दिली. यावर सोळंके यांनी समाधान व्यक्त करून संजीवनीच्या संस्था ग्रामीण भागात असूनही चौफेर प्रगतीचे कौतुक केले. या स्पर्धेमध्ये बॅडमिंटनमध्ये शासकीय तंत्रनिकेतन, अहिल्यानगरच्या संघाने प्रथम विजेतेपद पटकाविले.
विद्या अलंकार तंत्रनिकेतन, मुंबईच्या संघाने उपविजेते पद मिळविले. टेबल टेनिस स्पर्धांमध्ये मुंबईच्या विद्या अलंकार तंत्रनिकेतनने प्रथम क्रमांक किळविला तर शासकिय तंत्रनिकेतन, वाशीमचा संघ उपविजयी ठरला. मनोज जगदाळे, रोहित लोखंडे, प्रणित बाविसकर, निलम परांडे, शरयू शेटे व अभी हजारे यांनी पंच म्हणून काम पाहिले.




