पुणे जिल्हा : खेळाडूंची खिलाडूवृत्ती मैदानाबाहेर दिसते – गिल

लोणीत “पेरा’ प्रीमिअरचे उद्घाटन
लोणी काळभोर – खेळ हा प्रत्येकाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविणारी गोष्ट असून त्यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य अबाधित राहते. याशिवाय खेळ हा प्रत्येकाला आयुष्यातील सर्वांत महत्वाची गोष्ट शिकवतो. ती म्हणजे पराभव पचविणे. त्यामुळेच एका चांगल्या खेळाडूंची खिलाडूवृत्ती ही सामाजिक जीवनात मैदानाबाहेरही उठून दिसते, असे मत पुणे आर्मी क्रीडा अकादमीचे कमांडंट देवराज गिल यांनी व्यक्त केले.
एमआयटी आर्ट, डिजाइन व टेक्नॉलॉजी विद्यापीठात प्रीमिनेंट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन (पेरा) द्वारे आयोजित “पेरा’ प्रीमिअर चॅम्पियनशिपच्या उद्घाटन समारंभावेळी ते बोलत होते. एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरु तथा कार्याध्यक्ष व पेराचे अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, क्रीडा विभागाचे संचालक पद्माकर फड, ऑलिंम्पियन बॉक्सर मनोज पिंगळे, डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठाचे डॉ. गुलजार शेख, एमआयटी डब्लूपीयूचे पोपट धानवे, डॉ. अतुल पाटील आदी याप्रसंगी उपस्थित होते.
विश्वशांती प्रार्थना व दिपप्रज्वलनानंतर मॅनेट बॅंडच्या आकर्षक सलामीद्वारे कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्व सहभागी विद्यापीठांच्या ध्वजवाहकांच्या नेतृत्वाखाली खेळाडूंचे संचलन मैदानावर घेण्यात आले. 35 हून अधिक विद्यापीठांतील 3500 हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
हे सर्व खेळाडू पुढील 15 हून अधिक क्रीडा प्रकारांमध्ये त्यांचे कौशल्य पणाला लावणार आहेत. स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. सुराज भोयार यांनी प्रास्ताविक केले.पेराचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. हनुमंत पवार यांनी आभार मानले.





