नगर: आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : जरांगे

नगर – कोणताही कायदा तयार करताना त्यासाठी आधार लागतो. आता पाच हजार पुरावे हाच मोठा आधार असून, त्यानुसार राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे. मराठा समाजाची एकजूट झाली आहे. ही एकजूट जाऊ देणार नाही. कोणत्याही परिस्थितीत मराठ्या समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. सरकारने आता हा खेळ बंद करून तात्काळ मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी मनोज जारंगे पाटील यांनी नगर येथे केली.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची शनिवारी रात्री बारा वाजता अहमदनगर येथील नवनागापुर एमआयडीसी येथे सभा झाली. या सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, मराठा आरक्षणासाठी सरकारने तीस दिवसांची मुदत मागितली होती.
त्यांना आणखी 10 दिवस म्हणजे 40 दिवसांची मुदत दिली आहे. यातील 30 दिवस 14 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाले आहेत. आरक्षणासाठी नेमलेली समिती मुंबई, हैदराबाद आणि संभाजीनगर येथे इमानाने फिरते आहे.
आरक्षणा बाबतचे 5 हजार पुरावे या समितीला सापडले असल्याची माहिती मिळालेली आहे. कायदा तयार करताना पुराव्यांचा आधार लागतो. त्यासाठी पाच हजार पुरावे हाच मोठा आधार आहे.



