Nagar : कावीळ साथीने सोमवारचा आठवडे बाजार बंद
राजूर : कावीळचा प्रादुर्भाव झालेल्या राजूरमध्ये आरोग्य विभागाची सर्वेक्षणासाठी तीस पथके दाखल झाली. या पथकांनी राजूर शहरासह वाड्यावस्त्यांवर घरोघर भेटी देत कावीळ आजाराबाबत जनजागृती केली. राजूर गावात कावीळची मोठ्या प्रमाणावर साथ सुरू झाली आहे, यावर खबरदारी म्हणून आरोग्य विभागाच्या आदेशाने सोमवारचा आठवडा बाजार बंद ठेवण्यात आलेला आहे. अजून कावीळची साथ मोठ्या प्रमाणात वाढू नये म्हणून आठवडे बाजार बंदचा निर्णय ग्रामपंचायतने घेतला आहे.
शुक्रवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे यांनी राजूर येथे भेट दिली. गावातील पाण्याच्या उपचार केंद्राच्या कार्यक्षमतेत असलेल्या त्रुटींमुळे हा प्रादुर्भाव झाल्याचे त्यांना आढळून आले होते. यानुसार त्यांनी तत्काळ या केंद्राची स्वच्छता आणि दुरुस्तीबाबत सूचना दिल्या होत्या. त्यांच्या आदेशानुसार शनिवारी जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. नारायण वायभासे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शाम शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासमवेत राजूर येथे भेट दिली.
या पथकाने घरोघर भेटी देत रुग्णांची तपासणी केली. कावीळ या आजाराबाबत उपचार व घ्यावयाची काळजी याबाबतची माहितीपत्रके प्रत्येक घरात दिली. राजूर येथील सर्व खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांची बैठक तालुका आरोग्य अधिकारी शामकांत शेटे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नागरगोजे दूरस्थ प्रणालीद्वारे यात सहभागी झाले. या पथकाने पाण्याच्या टाकीची पाहणी केली.
रुग्णांमध्ये हिपॅटायटीसची लक्षणे आढळून आली आहेत. टाकीची साफसफाई पूर्ण झाल्यानंतर तसेच पाण्याच्या शुद्धिकरण तपासणीनंतर गावाचा पाणी पुरवठा सुरू केला जाईल, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शेटे यांनी सांगितले. राजुर गावात कावीळची मोठ्या प्रमाणावर साथ सुरू झाली आहे, यावर खबरदारी म्हणून आरोग्य विभागाच्या आदेशाने सोमवारचा आठवडा बाजार हा बंद ठेवण्यात आलेला आहे.





