Nagar : केडगावात पाणीबाणी, आठवड्यातून एकदाच पाणी!

अहिल्यानगर : केडगाव आणि पाणीप्रश्न हे समीकरण कायमचे जुळले आहे. केडगावकरांना दिवसाआड पाणी मिळणे दूरच आता चार दिवसांनी होणारा पाणीपुरवठा पाचव्या दिवशी आल्याने केडगावकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. उन्हाळाची चाहूल लागली की, केडगावात पाणीटंचाइ जाणवण्यास सुरुवात होते, याचा प्रत्यय यावर्षीही आला आहे. फेब्रुवारी महिन्यापासून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने आता नागरिकांना आठवड्यातून एकदाच पाणी मिळत असून, तेही कमी येत असल्याने पुन्हा विकतच्या टॅंकर, बैलगाडीवर अवंलबून राहण्याची वेळ आली आहे.
केडगावची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. केडगाव पाणीयोजना राबविताना ५० हजार लोकसंख्या गृहित धरण्यात आली होती. आता ती १ लाखांच्यावर गेली आहे. घर, बंगले, रो हाऊस, फ्लॅट बांधले जात असल्याने नागरीकरण झपाट्याने वाढत चालले आहे. आजही केडगावात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्पांची कामे सुरू असून, आता दुमजलीएवजी पाच ते सात मजली बिल्डींग आकाराला येत आहे. साहजिकच वाढत्या लोकसंख्येसाठी पाण्याची गरज वाढली आहे. मात्र, सध्या नागरिकांना चार दिवसांनी पाणी मिळत आहे.
केडगावसाठी माजी महापौर संदीप कोतकर यांच्या कार्यकाळात ४४ कोटींची स्वतंत्र पाणीयोजना मंजूर झाली. २००८ पासून ही योजना कार्यान्वित झाली असून, नागापूर पंप हाऊस येथून एकनाथनगर येथील मुख्य टाकीत पाणी येते. त्यानंतर ओंकारनगर, भूषणनगर, मोहिनीनगर व लोंढेमळा येथील पाण्याच्या टाकीत पाणी सोडण्यात येते. पाणीयोजना जेव्हा कार्यान्वित झाली तेव्हा २०४० ची लोकसंख्या गृहित धरून ती राबविण्यात आली होती. मात्र, २०१७ मध्येच एक लाख ही लोकसंख्या पूर्ण झाली असून, नवीन गृहप्रकल्पामुळे त्यात वाढच होत चालली आहे.
सध्या केडगावला दोन दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र, वीजपुरवठा खंडित जाणे, पाइपाइन फुटणे, पाणी कमी मिळणे अशा तां.ित्रक बिघाडामुळे तो पाचव्या दिवसांवर येऊन ठेपला आहे. पाणीपुरवठा सुरळीत होण्याएवजी विस्कळीत होत असल्याने नागरिकांची पाण्याची ओरड सुरू झाली आहे. त्यातच अनेक भागात नळाला मोटारी जोडल्या जात असल्याने नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळत आहे. विस्कळीत पाणीपुरवठा, नळाला थेट मोटारी जोडणे व उन्हाळ्यात पाण्याची वाढती मागणी व त्यात तां.ित्रक बिघाडामुळे केडगावकरांना पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे.
पाणीपट्टी वाढीचा शाॅक
मनपा प्रशासनाने २२ वर्षानंतर पाणीपट्टीत भरीव वाढ केली आहे. १ एपि्रलपासून अर्धा इंच नळधारकांना २४०० रुपये पाणीपट्टी मोजावे लागणार आहे. पाऊण इंच व एक इंचसाठी अनुक्रमे ४८०० व १० हजार रुपये पाणीपट्टी भरावी लागणार आहे. घरगुती पाणीपट्टीच्या दरात १५०० रुपयांवरून थेट २४०० रुपये वाढ केल्याने नऊशे रुपयांचा भुर्दंड वाढला आहे. नगर शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना केडगाव उपनगराला आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत असून, त्यातच पाणीपट्टीत वाढ केल्याने नागरिकांमध्ये रोष आहे. आम्हाला दिवसाआड पाणीपुरवठा करा मगच पाणीपट्टी वाढवा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
जास्त अश्वशक्तीचे हवे पंप
नागापूर पंपहाऊस येथून केडगावला दररोज ८५ लाख लीटर पाणी मिळते. पंपहाऊस अद्ययावत करून जास्त पाणी खेचणारे पंप बसविले तर रोज १६० लाख लीटर पाणी मिळेल. यामुळे किमान दिवसाआड पाणीपुरवठा होऊ शकतो. सध्या शंभर अश्वशक्तीचे दोन पंप आहेत. त्याची क्षमता वाढवून जास्त अश्वशक्तीचे पंप बसविण्याची गरज आहे. जेणेकरून उन्हाळ्यात नागरिकांना पाणीपुरवठ्यात अडचण येणार नाही.





