Nagar : कर्जत, जामखेड तालुक्यातील २९ गावांत पाणी टंचाई

जामखेड : कर्जत-जामखेड तालुक्यातील सुमारे २९ गावांना भीषण पाणी टंचाई जाणवायला सुरुवात झाली असून, दोन्ही तालुक्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देऊन तातडीने उपायोजना करून टंचाईग्रस्त गावांना टँकर चालू करण्याची मागणी केली आहे.
कर्जत, जामखेड मतदारसंघात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र संकटाचा सामना करावा लागत आहे. तसेच पशुधनासाठी आवश्यक पाण्याचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. कर्जत तालुक्यातील देमनवाडी, पाटेगाव,थेरगाव, गुरव पिंपरी, चांदेबुद्रुक, खुरंगेवाडी, मानेवाडी, वालवड, चांदे खुर्द, सोनळवाडी, पिंपळवाडी, डिकसळ या १२ गावांना तसेच जामखेड तालुक्यातील मुंगेवाडी, चोभेवाडी, बराणपूर, मुंजेवाडी, खुटेवाडी, वाघा, बांधखडक, पिंपळगाव आवळा, कोल्हेवाडी, सातेवाडी, खांडवी, पिंपळगाप उंडा, दौडचीवाडी, धनेगाव, जवळके, घुलेवाडी, दिघोळ या जामखेड तालुक्यातील १७ असे एकूण २९ गावांना तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे.
या गावांना तातडीने टँकर सुरु करण्यात यावेत, संभाव्य टंचाईग्रस्त टँकर मंजुरी व नियोजन करण्यात येऊन जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोया करण्यात यावी,अशी प्रमुख मागणी आमदार रोहित पवार यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेट घेऊन केली आहे.
यंदा पाऊस कमी झाल्याने कर्जत-जामखेड मतदारसंघातील काही गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. त्यामुळं टंचाईग्रस्त गावांमध्ये तातडीने टँकर सुरू करावेत, पुढील संभाव्य पाणीटंचाईचे चोख नियोजन करावं तसेच जनावरांच्या पाण्याचीही सोय करण्याची मागणी जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे. याबाबतचे पत्रही त्यांना देऊन त्यांच्याशी चर्चा केली.
– रोहित पवार, आमदार





