Nagar : महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांचे निधन

राहुरी : महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील (वय 54) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी पहाटे पुण्यामध्ये निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले आहेत. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील कवठे एकंद या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा कुलगुरू पदाचा पदभार सांभळण्यापूर्वी त्यांनी मुंबई येथील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या (सिर्कोट) संचालक पदाची व तंत्रज्ञान हस्तांकरण प्रमुख ही महत्वाची पदे भूषवली आहेत. काही काळ त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक येथील प्रभारी कुलगुरू या पदाचा देखील कारभार सांभाळला होता.
कृषी क्षेत्रातील संशोधन व विस्तार उपक्रमातील सेवेचा त्यांना ३३ वर्षांचा प्रदिर्घ अनुभव होता. ४ पुस्तके, १९९ संशोधनात्मक पेपर, तांत्रिक शिक्षणासंबंधीची १४ पुस्तके व १ पेटंट त्यांच्या नावावर आहे.
राहुरी कृषि विद्यापीठामध्ये कुलगुरूपदाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी योग्य निर्णय घेऊन शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यात विद्यापीठाला नावलौकिक मिळवून दिला. त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे विद्यापीठाला नुकतेच उत्कृष्ट ‘ए’ ग्रेड मानांकन प्राप्त झाले आहे.





